Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात आदरांजली कार्यक्रम

देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.


माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात आदरांजली कार्यक्रम

Memorial Program |

सुप्रसिद्ध गायक हेमंत पेंडसे यांचा ‘भावस्वरांजली’ कार्यक्रम

लातूर (Memorial Program) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक पटलावर आपल्या अमोघ नेतृत्वाने भुरळ पाडणारे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी, (दि. २६ मे २०२६) सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. या निमित्ताने सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे यांच्या ‘भावस्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकनेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा संघर्षमय व यशस्वी राजकीय प्रवास राहिला आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजबाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ राजकारणच नव्हे तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत आणि कला अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा सहज वावर राहिला. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना जाते. लातूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विलासराव देशमुख यांनी मांजरा नदीवर बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध करून दिले. विरोधकांनाही आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने आपलेसे करणारे विलासराव देशमुख खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.

विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे आदरांजली वाहण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे उपस्थित राहावे, अशी अपेक्षा आहे.

सकाळी ९ वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध शिष्य हेमंत पेंडसे व त्यांचे सहकारी शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ‘भावस्वरांजली’ सादर करतील. उपस्थित नागरिकांनी, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्नेही मंडळींनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर सकाळी १० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल.

या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.