कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर काही तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
कळवण (Maternal Death) : कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर काही तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेनंतर आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आंदोलन करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला.
तताणी (ता. बागलाण) येथील संगीता पवार यांना गुरुवारी (दि.१६) प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सुमारे साडेचारच्या सुमारास सिझेरियन पद्धतीने त्यांची प्रसूती करण्यात आली. त्या वेळी माता व नवजात बालक दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शुक्रवारी (दि.१७) सकाळी सुमारे ९ वाजता संगीता यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी संगीता पवार यांचे पती तात्या नारायण पवार यांनी गंभीर आरोप करत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे म्हटले आहे. रुग्णाची प्रकृती खालावत असताना वेळेत माहिती न देता उशिरा निर्णय घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला.
घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार देत वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी परिस्थिती समजून घेत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. अखेरीस वैद्यकीय अधीक्षकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर नातेवाईकांनी तो स्वीकारला.
रुग्ण कल्याण समितीवर प्रश्नचिन्ह
कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू होऊन काही तास उलटूनही वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अनेक डॉक्टर व कर्मचारी निवासी भत्ता आणि वेतनवाढ घेत असूनही वेळेवर उपस्थित राहत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रुग्ण कल्याण समितीही केवळ कागदोपत्रीच असल्याची टीका नातेवाईकांकडून करण्यात आली.
शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी उपचाराची सुविधा असताना शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे व साहित्य खासगी मेडिकलमधून आणण्यास सांगितले जाते, अशीही तक्रार समोर आली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांचा हेतूच प्रश्नचिन्हात आला आहे. काही डॉक्टर खासगी रुग्णालयातही सेवा देत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.