Hingoli Railway Committee: मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अखेर 'नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस' (गाडी क्र. १७६६५/१७६६६ आणि १७६६७/१७६६८) या नवीन रेल्वे गाडीचा
हिंगोली (Hingoli Railway Committee) : मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अखेर 'नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस' (गाडी क्र. १७६६५/१७६६६ आणि १७६६७/१७६६८) या नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने या गाडीचे स्वागत करण्यात आले असले, तरी रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेले नवीन नियमित वेळापत्रक प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचे असल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या चुकीच्या वेळेचा निषेध नोंदवण्यासाठी समितीच्या सदस्यांनी चक्क काळा रुमाल पांघरून हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांच्या मार्फत दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन सादर केले.
रेल्वे बोर्डाने (Hingoli Railway Committee) ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिलेल्या या गाडीचे सध्याचे नियमित वेळापत्रक अत्यंत असुविधाजनक आहे. या वेळापत्रकानुसार ही गाडी रात्री २१:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० (दीड) वाजता मुंबईला पोहोचते. दुपारी मुंबईत पोहोचल्यामुळे प्रवाशांचा अर्धा कार्यरत दिवस वाया जाणार आहे. याचा मोठा फटका व्यापारी, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना बसणार आहे. या गैरसोयीमुळे प्रवासी पर्यायी वाहनांचा शोध घेतील आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न बुडून ही गाडी तोट्यात जाण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.
पहिली 'उद्घाटन फेरी' ठरली होती सोयीची
समितीने निवेदनात नमूद केले आहे की, १९ मे २०२६ रोजी या रेल्वेची जी उद्घाटन विशेष फेरी (गाडी क्र. ०७६६७) चालवण्यात आली होती, तिचे वेळापत्रक अतिशय उत्तम होते. त्या दिवशी ही गाडी नांदेडहून सायंकाळी ४:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:५० वाजता कुर्ला (मुंबई) येथे पोहोचली होती. सकाळी लवकर मुंबईत पोहोचल्यामुळे प्रवाशांना कामासाठी पूर्ण दिवस मिळतो. या वेळेची तांत्रिक व्यवहार्यता आधीच सिद्ध झाली असल्याने हीच सायंकाळी ४ ची वेळ कायमस्वरूपी लागू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
हिंगोली रेल्वे स्थानकावर हे निवेदन देतेवेळी हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीचे नंदकिशोर तोष्णीवाल, गोवर्धनअण्णा वीरकुंवर, वसंत भट्ट, शेख खलील बेलदार, कैलास शहाणे, शेख नोमान शे.नईम, गोविंद प्रजापती, शेख जमील बागवान, गणेशलाल साहू, शेख नफीस पैलवान, शेख मझहर यांच्यासह रेल्वे प्रेमी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.