MP Amar Kale: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षश्रेष्ठींनी अधिकृत भूमिका जाहीर करून कार्यकर्ते आणि जनतेतील संभ्रम दूर करावा: खासदार अमर काळे
वर्धा (MP Amar Kale) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षश्रेष्ठींनी अधिकृत भूमिका जाहीर करून कार्यकर्ते आणि जनतेतील संभ्रम दूर करावा, अशी मागणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी केली.दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देशोन्नतीशी संवाद साधताना ते बोलत होते.
खासदार काळे (MP Amar Kale) म्हणाले, "पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या विषयावर आमची कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. आमचे मतही जाणून घेण्यात आलेले नाही. पवार साहेबांनी खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांची मते घेतली असतील, तर काहींचे मत एनडीएसोबत जाण्याचे, तर काहींचे काँग्रेससोबत जाण्याचे असू शकते. मात्र, मला पक्षाच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा केवळ माध्यमांतूनच ऐकायला मिळाल्या."
ते (MP Amar Kale) पुढे म्हणाले, "आमच्या खासदारांच्या ग्रुपवरही या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षाच्या वर्धापनदिनालाही मी सर्वांसमोर माझी भूमिका मांडली होती. सध्या माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू असून त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे."
"माझी आदरणीय शरद पवार साहेब तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एकदाच स्पष्ट भूमिका जाहीर करून ती सर्व कार्यकर्ते आणि जनतेसमोर मांडावी. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल," असेही खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी सांगितले.