Pickup-Bike Accident: उदगीर तालुक्यातील उदगीर–लातूर महामार्गावर लोहारा व करडखेड गावांदरम्यान भरधाव पिकअप व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला
उदगीर (Pickup-Bike Accident) : उदगीर तालुक्यातील उदगीर–लातूर महामार्गावर लोहारा व करडखेड गावांदरम्यान भरधाव पिकअप व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन (क्र. एमएच-४४-यू-२१६९) हे लातूरहून उदगीरकडे येत होते, तर मोटारसायकल (क्र. एमएच-२४-वाय-२८३९) उदगीरहून लातूरकडे जात होती. मोटारसायकलवरील दोन्ही युवक खाजगी कामानिमित्त लातूरकडे जात असताना लोहारा व करडखेड गावांदरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलस्वार हवेत उडून पिकअपच्या पुढील काचा फोडत थेट वाहनाच्या आत जाऊन पडला. या भीषण अपघातात उमर मगदुम शेख (वय २२), रा. मरसांगवी, ता. जळकोट, सध्या मुक्काम बनशेळकी रोड, उदगीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर अलीम अकबर मुंजेवार हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी अलीम अकबर मुंजेवार यांना उपचारासाठी उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या (Pickup-Bike Accident) दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.