महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषेचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या 105 दिवसांत मराठी शिकण्याची संधी; व्यावहारिक ज्ञान आत्मसात केलेल्या अमराठी चालकांवर कारवाई होणार नाही
मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषेचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली 105 दिवसांची मुदत आता संपत आली आहे. महाराष्ट्र दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला होता. यापुढे अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, या 105 दिवसांच्या कालावधीत ज्या अमराठी चालकांनी मराठीचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान मिळवले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नसल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या किंवा मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या चालकांवर 15 ऑगस्टपासून नियमानुसार कारवाई केली जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
प्रताप सरनाईक यांची भूमिका काय?
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठीचे किमान आणि दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारे ज्ञान असणे आवश्यक असल्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. मराठी भाषेचे पूर्णपणे ज्ञान अपेक्षित नसले तरी प्राथमिक स्वरूपात मराठी बोलता आणि समजता येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदी भाषिक तसेच इतर अमराठी चालकांना मराठी शिकता यावी, यासाठी राज्य सरकारने मानवतावादी दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मराठी शिकवण्याची जबाबदारी सरकारची नसतानाही चालकांना भाषा आत्मसात करता यावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी का अनिवार्य?
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीच्या माध्यमातून प्रवाशांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे स्थानिक भाषेचे प्राथमिक ज्ञान चालकांना असावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार चालकांना मराठी बोलता आणि दैनंदिन व्यवहारात वापरता येणे अपेक्षित आहे.
चालक संघटनांनी मागितली होती मुदत
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची अट लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, काही चालक संघटनांनी मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. चालकांना भाषा शिकण्यासाठी संधी मिळावी, यासाठी सरकारने त्यांची मागणी मान्य करत 105 दिवसांचा कालावधी दिला.
ही मुदत महाराष्ट्र दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत ठेवण्यात आली.
अमराठी चालकांसाठी मराठीचे वर्ग
या कालावधीत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे प्राथमिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी राज्य सरकारकडून मराठी भाषेचे वर्गही घेण्यात आले. चालकांना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना मराठीचा वापर करता यावा, यासाठी सरकारने प्रयत्न केले.
आता हा प्रशिक्षण आणि शिकण्यासाठी दिलेला कालावधी संपल्यानंतर नियमांची अंमलबजावणी करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
15 ऑगस्टनंतर काय होणार?
15 ऑगस्टनंतर मराठी बोलता न येणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक मराठी बोलण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाऊ शकते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापुढे मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, सरकारने दिलेल्या 105 दिवसांच्या कालावधीत मराठीचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान मिळवलेल्या अमराठी चालकांना कारवाईपासून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी नेमक्या कोणत्या पद्धतीने करते आणि त्यानंतर कोणत्या कारवाया होतात, याकडे रिक्षा-टॅक्सी चालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.