Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त तपासणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी
शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी, वजन-उंची मोजणी व लसीकरणावर भर
हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त तपासणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. तसेच प्रत्येक बालकाची वजन व उंची मोजणी, पोषणस्थितीचे मूल्यमापन आणि नियमित लसीकरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त तपासणीबाबतची आढावा बैठक आज (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे यांनी प्रास्ताविक करून संयुक्त तपासणी मोहिमेची उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके पथके तसेच अंगणवाडी सेविका यांची भूमिका स्पष्ट केली. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अंगणवाडी केंद्रातील प्रत्येक बालकाचे वजन व उंची मोजणे, आरोग्य तपासणी करणे, पोषणस्थितीचे मूल्यमापन करणे आणि लसीकरणाची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रतिनिधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे, विस्तार अधिकारी अविनाश बोथीकर तसेच सर्व पर्यवेक्षिका प्रत्यक्ष उपस्थित होत्या. तर सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग नोंदविला.