मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे.
तोडगा न निघाल्यास धाराशिवही बंद करण्याचा इशारा; राज्यभर रस्ता रोको, उपोषणांमुळे आंदोलन तीव्र
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढली असून, सरकारकडून अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप येत आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) जालना, बीड, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाला नाही, तर धाराशिव जिल्ह्यातही बंद पुकारण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
बंददरम्यान चारही जिल्ह्यांतील बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी संघटनांनी आंदोलनाला साथ दिल्यास किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठाही बंद राहण्याची शक्यता आहे. प्रमुख महामार्ग आणि शहरांमधील वाहतूक रोखण्यासाठी मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात.
मात्र अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, रुग्णवाहिका, दूध पुरवठा आणि इतर आणीबाणीच्या सेवा सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, आज राज्यातील विविध भागांत आंदोलनाचा जोर वाढला. छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड आणि लातूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर आंदोलकांनी रस्ता रोखून धरला. पुलावर ठिय्या देत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या. वाहन हटवण्याच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला.
लातूरमध्येही आंदोलनाची तीव्रता वाढली असून, कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ ठिय्या आंदोलन केले. सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत गुरुवारी होणारा लातूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोरही जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. बालाजी पाटील कदम बटाळकर या मराठा तरुणाने सलग चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारच्या शिष्टमंडळाकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी अद्याप समाधानकारक निर्णय झालेला नाही. सरकारने आजच ठोस निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन आणखी व्यापक आणि आक्रमक करण्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.