Amravati Bhaurao Deshmukh: संसदपटू प्रा. बि.टी. अर्थात भाऊराव तुळशीराम देशमुख यांच्यावर हिंदू स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आला.
अमरावती (Amravati Bhaurao Deshmukh) : विदर्भातील अनुशेष निर्मूलनाचे प्रणेते व उत्तम संसदपटू प्रा. बी. टी. अर्थात भाऊराव तुळशीराम देशमुख यांच्यावर शनिवारी सांयकाळी स्थानिक हिंदू स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रध्वजात ठेवलेल्या बी.टींना बंदूकीच्या फैरी झाडून शेवटची सलामी देण्यात आली.
बी.टी.चे शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने नवसारी येथील राहत्या घरी निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह व विविध क्षेत्रातील मंडळींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या. आमदार, खासदार यांच्यासह अनेकांनी निवासस्थानी जाऊन बी.टी.चे अंत्यदर्शन घेतले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेवरून त्यांच्या कार्यालयाने बी.टीं.ची (Amravati Bhaurao Deshmukh) संपूर्ण कारकीर्द नमुद असलेली नस्ती मागवून घेतली होती. त्यातील नोंदीनुसार बी.टी. काहीकाळ विधान परिषदेचे हंगामी सभापती राहील्याची नोंद आढळली. त्या नोंदीचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात बी.टींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तसे आदेश जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी येरेकर यांनी लगेच तयारी सुरू केली. शनिवारी सांयकाळी ५ वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली.
तत्पूर्वी तेथे जवानांनी सलामी दिली व बी.टींचे (Amravati Bhaurao Deshmukh) पार्थीव राष्ट्रध्वजात ठेवले. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत बी.टींची अंत्ययात्रा निघाली. हिंदू स्मशानभूमित पोहोचल्यावर अंत्यसंस्कार सुरू झाले. बंदूकीच्या फैरी झाडून बी.टीं.ना शेवटची सलामी देण्यात आली. बिगूल वाजल्यावर बी.टींवरचा राष्ट्रध्वज त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. बी.टींची छोटी कन्या दिपा लाड यांनी साश्रूनयनांनी पार्थीवाला मुखाग्नी दिला. यावेळी मोठी कन्या वैशाली वानखडे व बीटींचे भाऊ नाना देशमुख आणि कुटुंबातील अन्य सदस्य बाजुला उपस्थित होते.
यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड तर प्रशासकीय प्रमुख म्हणून विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह पोलिस आयुक्त राकेश ओला हजर होते. याशिवाय कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने हजर होती. बी.टींना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.