Chaitra Poornima Palkhi : मनसर येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित भव्य पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिगीतांच्या सुरात
मनसर (Chaitra Poornima Palkhi) : दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर श्री कृष्ण देवस्थान मनसर येथे भक्तिमय वातावरणात पालखी शोभायात्रा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री कृष्ण मंदिरापासून मनसर चौकापर्यंत निघालेल्या या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होत श्रीकृष्णाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. श्रीकृष्णाची विधिवत पूजा-अर्चा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर सुशोभित पालखीत श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भजन-कीर्तनांच्या सुरात भक्तांनी नाचत-गात पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.
शोभायात्रेचा मार्ग फुलांच्या तोरणांनी व आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. (Chaitra Poornima Palkhi) ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तांनी “गोविंदा-गोविंदा”, “जय श्रीकृष्ण”च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय केले. या सोहळ्याचे आयोजन श्री कृष्ण देवस्थान व्यवस्थापक ट्रस्ट, मनसर यांच्या वतीने करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व पुजारी श्री. महेंद्र तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. संयोजनाची धुरा श्री. प्रफुल्ल पुसदेकर, श्री. मयूर तळेगावकर, विकास वायदेशकर, दिनेश पुसदेकर, सचिन कळमकर, सुरज करंजकर यांनी समर्थपणे सांभाळली.
तसेच प. पू. राजू दादा शास्त्री यांच्या उपस्थितीत (Chaitra Poornima Palkhi) सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या आशीर्वचनांनी भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षेची योग्य काळजी आणि स्वयंसेवकांचे उत्कृष्ट योगदान यामुळे सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या भव्य पालखी सोहळ्याने मनसर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडवले.