Malkapur Damini Squad: 'दामिनी पथक' मलकापूरमधून सुरू झाले आहे, जे महिलांना संरक्षण देण्यासाठी सज्ज असलेले पथक आहे. यात महिला पोलिस उपनायिका माधुरी साळुंके नेतृत्व
माधुरी साळुंके यांच्याकडे पथक प्रमुखपदाची धुरा; छेडछाड व रोडरोमिओंवर असणार कडक नजर
मलकापूर (Malkapur Damini Squad) : महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मलकापूर उपविभागाकरिता विशेष 'दामिनी पथक' स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संवेदनशील ठिकाणी गस्त अन् तात्काळ कारवाई
हे पथक शाळा, महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, मुलींची वसतिगृहे, कोचिंग क्लासेस, बसस्थानक, रेल्वे स्थानक, कॅफे, सायबर कॅफे, उद्याने आणि बाजारपेठ यांसारख्या संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त घालणार आहे. महिला व मुलींची छेडछाड, पाठलाग करणे, अश्लील वर्तणूक करणे तसेच सोशल मीडियाद्वारे होणारा त्रास यासंबंधी तक्रार प्राप्त होताच हे पथक तात्काळ कारवाई करेल. टवाळखोर व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली जाणार आहेत.
सुरक्षा आणि हेल्पलाईनबाबत जनजागृती
केवळ कारवाईवरच भर न देता, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक ११२, १०९१, १८१ व १९३० यांबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या (Malkapur Damini Squad) मोहिमेत शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, नगर परिषद, ग्रामपंचायत, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांशी समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांनी दिले आहेत.
दामिनी पथक व संपर्क क्रमांक:
नागरिकांना किंवा महिलांना अडचणीच्या वेळी थेट संपर्क साधता यावा यासाठी पथकातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत:
महिला पो.उपनि. माधुरी साळुंके (पथक प्रमुख): ७७०९९८९९८७
महिला पो.ह. प्राजक्ता चिम: ९६०४७९१४२४
महिला पो.कॉ. अर्चना मते: ९६३७३५०५६८
चालक पो.हे.कॉ. स्वप्नील खंडारे: ९६६५३४६५५१
आवाहन:
मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद व संग्रामपूर परिसरातील महिला अथवा मुलींवर कोणतीही छेडछाडीची किंवा अपप्रवृत्तीची घटना घडल्यास त्यांनी घाबरून न जाता तात्काळ दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.