Farmers Rasta Roko: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची बोळवण करत वाऱ्यावर सोडण्याचे कुटील कारस्थान सरकारचे असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.
औसा (Farmers Rasta Roko) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची बोळवण करत वाऱ्यावर सोडण्याचे कुटील कारस्थान सरकारचे असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी लामजना येथे विविध संघटनांच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे औसा तहसीलदारांना दिला आहे. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं वचन दिलं होतं मात्र तो शब्द सरकारने पाळला नाही आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचे महापाप सरकारने केल्याचा आरोप निवेदनात केलेला आहे.
आज निसर्गाचा प्रकोप होऊन अस्मानी संकट कायम शेतकऱ्याच्या डोक्यावर असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत सुलतानी संकट आमच्या माथी मारण्याचे काम सातत्याने करत आहे. आमच्या हक्काचा पिक विमा नाही, सरसकट कर्जमुक्ती नाही, उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव नाही. एक रुपयातील चार ट्रिगरवाली लोकप्रिय विमा योजना बंद केल्याचा संताप या आंदोलनातून व्यक्त होणार आहे.
अशा मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर (Farmers Rasta Roko) येऊन सरकार विरोधात संताप व्यक्त करतील. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. सरकारने शेतकऱ्याच्या मागण्यांकडे पाठ फिरवली आहे. म्हणून 24 ऑगस्ट रोजी खांद्यावर चाबूक आणि हातात रूमणे घेत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, राजेंद्र मोरे, रुपेश शंके, बालाजी जाधव, सतीश सोळंके, शिवाजी पाटील, शाहूराज कांबळे, दत्ता भांगे, कल्याणप्पा हुरदळे, दीपक कांदगुळे, विवेक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.