Farm Loan Waiver Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 2026 लाभासाठी महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि अंग्रेस्टॅक नोंदणी पूर्ण करणे
हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अँग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.
योजनेनुसार (Farm Loan Waiver Yojana) पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमानुसार विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एक रक्कमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अँग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती श्रीमती फुफाटे यांनी दिली.
माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.