MLA Shweta Mahale Patil: महाराणा प्रताप जयंती वैशाख शुक्ल दिवशी चिखलीत आयोजित कार्यक्रमात आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी रक्तदानासाठी जनजागृती करण्याच्या संकल्पनेमुळे उत्साहपूर्ण वातावरण
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : "रक्तदान हीच हिंदू सूर्य महाराणा प्रतापांना खरी आदरांजली आहे. महाराणा प्रताप यांनी स्वाभिमान, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रक्तदानासारख्या सेवाभावी उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे," असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी केले.
हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त चिखली शहरात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी दुग्धाभिषेक, दुपारी रक्तदान शिबिर व खिचडी वाटप तसेच सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना आमदार श्वेताताई महाले-पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी भेट देऊन सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिरात उपस्थित राहून आमदार महाले-पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी रक्तदात्यांशी संवाद साधला, त्यांचे अभिनंदन केले तसेच रक्तदानाच्या सामाजिक महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी शोभायात्रेत सहभागी होत मिरवणुकीच्या प्रारंभी आरती करून शुभारंभ केला. रात्री मिरवणुकीची सांगता त्यांच्याच उपस्थितीत राष्ट्रगीताने झाली. यावेळी बोलताना आमदार महाले-पाटील म्हणाल्या की, महाराणा प्रताप यांचे संपूर्ण जीवन हे स्वाभिमान, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याची गरज आहे.

रक्तदान हा केवळ वैद्यकीय गरज भागविणारा उपक्रम नसून तो सामाजिक बांधिलकी जपणारा आणि गरजूंच्या जीवनाला नवी संजीवनी देणारा मानवतेचा उत्सव आहे. त्या पुढे म्हणाल्या की, अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी रक्ताची सतत आवश्यकता असते. अशा वेळी रक्तदात्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे त्यांच्या त्याग, सेवा आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना उजाळा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून युवकांनी त्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, जयंतीनिमित्त महाराणा प्रताप पुतळा परिसर भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने नटविण्यात आला होता. शहरात सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे व बँडच्या संगीतामुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. विविध सामाजिक, धार्मिक व युवक संघटनांसह नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या प्रसंगी आमदार श्वेताताई महाले-पाटील (MLA Shweta Mahale Patil) , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, अंकुशराव पडघान, बुलढाणा नगर परिषदेचे गटनेते कुणालभाऊ गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष कपिलदादा खेडेकर, विरोधी पक्षनेते डॉ. महम्मद इसरार, नारायणसिंह राजपूत, सेवानिवृत्त नायब तहसीलदार एस. व्ही. इंगळे, डॉ. प्रतापसिंग परिहार, श्रीराम नागरी बँकेचे संचालक चेतन देशमुख, नगरसेवक डॉ. निलेश गावंडे, बाजार समितीचे बाजार समिती सभापती समाधान सुपेकर माजी सभापती डॉ. संतोष वानखेडे, उपसभापती किसनलाला धोंडगे,, काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा संचालक रामभाऊ जाधव, काशिनाथ आप्पा बोंद्रे, बाळूभाऊ पवार, ज्योतीताई खेडेकर, नगरसेवक राणा सुरेंद्रसिंग ठाकूर, गोपाल देव्हडे, दीपक वाधवाणी, राम बनसोडे, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, संजय चेके-पाटील, भास्करराव मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख श्रीराम झोरे,शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, माजी शहरप्रमुख निलेश अंजनकर यांच्यासह महाराणा प्रताप प्रेमी व हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. छत्रपती संभाजीनगर येथील श्री सत्य साई ब्लड सेंटरचे पीआरओ अरुण वाकडीकर व चरणसिंह चौहान तसेच जीवनधारा ब्लड बँक, बुलढाणा येथील संदीप तोरमल यांनी शिबिराचे नियोजन व कामकाज पाहिले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांचे आभार मानण्यात आले. मिरवणुकी दरम्यान राणा कृषी सेवा केंद्र, आदर्श अर्बन पतसंस्था ,हिरकणी महिला अर्बन पतसंस्था , आदींनी ठिकठिकाणी निवडणुकीतील सहभागी महाराणा प्रताप्रेमीसाठी थंड पाणी आणि शरबताचे वाटप केले.