Mahadev Maharaj: श्री महादेव महाराज तात्याऊली या मंदिराच्या सप्ताहभर चालणाऱ्या काळ्याच्या कीर्तनासह नामस्मरण सत्रांत भक्तांना जिवंत होण्यासाठी संकेत देते.
मुक्तेश्वर मंदिरातील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
औसा (Mahadev Maharaj) : भेदरहित अवस्था प्राप्त होणे म्हणजे काला होय, आणि या काल्याच्या महाप्रसाद सेवनातून भगवान श्रीकृष्णाचे चरित्र लीला श्रवणातून पुण्यलाभ होऊन मनुष्य बरोबर सुखाला प्राप्त होऊन, जीवनमुक्त होतो, असे चिंतन श्री महादेव महाराज तात्या माऊली श्रीक्षेत्र चाकरवाडीकर यांनी मांडले.
सोमवारी (दि. 27) येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिरातील आषाढमास सततधार रुद्राभिषेक तथा अखंड हरिनाम शिवनाम सप्ताहाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनात श्री तुकाराम महाराज यांच्या 'उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात', या अभंगावर निरूपण करताना ते बोलत होते.
ह.भ.प. श्री महादेव महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून उद्बोधक व अभ्यासपूर्ण असे चिंतन मांडले. ते म्हणाले, काला वैकुंठी दुर्लभ आहे. म्हणून तर देव हा काला आपल्याला मिळण्याची अपेक्षा करतो. काल्याचे कीर्तनात देवाचे चरित्र वर्णन करावे, या श्रवणाने आणि भगवान गोपाळकृष्ण यांचे चरित्र उच्चारण व श्रवण केल्याने आपला आत्मउद्धार होतो. महापातकाचा नाश होतो आणि आपल्यातील अंतकरणात प्रेम जागृत होऊन आपल्या हातून परमार्थिक साधना नामस्मरण सेवा घडू शकते यासाठी काल्याचेअवश्य किर्तन ऐकावे असे महाराज म्हणाले. सर्व प्राण्याला जन्म मरण आहे.
पण नामस्मरण भक्ती आणि संत सेवेची संधी व अधिकार केवळ मनुष्य जातीला आहे म्हणून नामस्मरण या जीवन मुक्तीच्या मार्गावर स्थिर होण्यासाठी संत संगतीत आणि सप्ताहातील नामसंकीर्तनात यावे. जे संत अखंडपणे आपल्या मुखातून देवाचे नाम घेऊन त्याचा ध्यास स्मरण करतात आणि देहाने पूर्णतः भक्तीत तल्लीन होऊन आपल्या श्वासागणीस सेवेत समर्पित असतात, त्यांच्या सहवासातून आपण उद्धरून जातो. असे ते म्हणाले.
यावेळी श्री विजयकुमार मिटकरी यांनी सपत्नीक श्री महादेव महाराज माऊली यांचा भरपेरावा व शाल पुष्पहार अर्पण करून भव्य सत्कार कीर्तन स्थळी केला. तसेच मुक्तेश्वर मंदिराचे पुजारी श्री मुन्ना स्वामी यांचाही मिटकरीआप्पांनी सपत्नीक सत्कार केला. यावेळी श्री महादेव महाराज व मुक्तेश्वर न्यासाचे पदाधिकारी यांच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपाळकाला संपन्न झाला. किर्तन श्रवणास औसा शहरातील व पंचक्रोशीतील हजारोंचा भक्त वर्ग व वारकरी समाज उपस्थित होता.