Wardha Cyber Police: वर्ध्यात ६० वर्षीय वृद्ध चंद्रशेखर वायुदेव भगत यांचा हरवलेला मोबाईल ऑटो चालक आणि सायबर पोलिसांच्या सहाय्याने परत मिळाला. सामाजिक जबाबदारीने मोबाईल थेट पोलिस स्टेशनला जमा
प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण; हरवलेला मोबाईल सुखरूप परत
वर्धा (Wardha Cyber Police) : मोबाईल हरवला की, तो परत मिळेल याची आशा अनेकजण सोडून देतात. मात्र वर्धा शहरात घडलेल्या एका घटनेने अजूनही समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. एका प्रामाणिक ऑटो चालकामुळे आणि सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे ६० वर्षीय वृद्धाला त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळाला. वर्ध्यातील चंद्रशेखर वायुदेव भगत हे ऑटोने प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच ते चिंतेत पडले. महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती असल्याने मोबाईल परत मिळण्याची त्यांना फारशी अपेक्षा नव्हती.
दरम्यान, संबंधित ऑटो चालक सुलतान शेख करीम शेख यांच्या ऑटोमध्ये तो मोबाईल आढळून आला. कोणताही मोह न बाळगता त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मोबाईल थेट सायबर पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. (Wardha Cyber Police) सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल भेग्राम आणि पोलिस हवालदार दिनेश बांधकर यांनी तत्काळ मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर चंद्रशेखर भगत यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे परत देण्यात आला.
हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्यानंतर भगत यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. त्यांनी ऑटो चालक आणि (Wardha Cyber Police) पोलिस प्रशासनाचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रामाणिकपणाच्या अशाच एका घटनेची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या सकारात्मक संदेशाचा प्रभाव समाजावर दिसून येत असून, अवघ्या दोन दिवसांत पाच नागरिकांनी त्यांना सापडलेले मोबाईल स्वतःहून (Wardha Cyber Police) सायबर पोलिसांकडे जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे आजही समाजात माणुसकी, विश्वास आणि प्रामाणिकपणाची साखळी कायम असल्याचा दिलासादायक संदेश मिळत आहे.