Water Resources Department: लातूरमध्ये तावरजा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेली दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. पाणी सोडण्यासाठी अपेक्षित कालव्याची दुरुस्तीही केली नाही.
तावरजा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात दिरंगाई
लातूर (Water Resources Department) : लातूर तालुक्यातील उटी खुर्द येथे असलेल्या पावर जा मध्यम प्रकल्पातून उन्हाळी हंगामी पाणीपाळी सोडण्यास जलसंपदा विभागाने दिरंगाई चालविली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे कडक उन्हाचा मारा सुरू असताना बागायती पिके वाळून जात असून जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास चालविलेली दिरंगाई शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. विशेष म्हणजे पाणी सोडण्यासाठी कालव्याची दुरुस्तीही या विभागाने अद्याप केली नाही.
लातूर व औसा तालुक्याच्या सीमा भागात वाहणाऱ्या तावरजा नदीवर उटी खुर्द येथे असलेला मध्यम प्रकल्प गेल्या पावसाळ्यात 100 टक्के भरला होता. प्रकल्प भरल्याने अनेकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीमध्ये करण्यात आला. नदीकाठच्या लोकांना इशारा देत अनेकदा पाण्याचा विसर्ग केल्याने यंदाच्या हंगामात उन्हाळी पाणी मिळेल असा आशावाद प्रकल्प खालील शेतकऱ्यांना होता. खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर सध्या तावरजा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याखाली मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी उभा ऊस आता वाळून जात आहे.
जलसंपदा विभागाने एप्रिल महिन्यातच शेती सिंचनासाठी पाणी पाळी सोडणे आवश्यक होते. मात्र तावरजा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे याकडे साप दुर्लक्ष झाले आहे. या भागात शेतकऱ्यांनी पाणी मागणी केली नाही, असे मानून जलसंपदा विभाग पाणी पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहे. विशेष म्हणजे या (Water Resources Department) प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीला देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. मांजरा प्रकल्पातून पाणी पाळी सोडण्यात आली. शिवाय मांजरा नदीपात्रात पाणी सोडून नदीत असलेले सर्व बॅरेज पूर्णतः पाण्याने भरण्यात आले. मात्र मांजरा प्रकल्पखालील शेतकऱ्यांना एक न्याय आणि तावरजा मध्यम प्रकल्पाखालील शेतकऱ्यांना दुजा न्याय अशी भूमिका राजकर्त्यांनीही घेतल्याचे या दुर्लक्षावरून दिसून येत आहे. या शेतकऱ्यांना जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधी न्याय देणार आहेत का? हा खरा सवाल आहे.