जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शनिवारी (दि.४) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
लातूर (Latur Collector) : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शनिवारी (दि.४) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी श उपस्थित होते.
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आयुक्त पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. भारत बास्टेवाड यांची बदली झाली आहे. डॉ. भारत बास्टेवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून लातूर यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केल्याने लातूरचा त्यांना अभ्यास आहे. यामुळे लातूरच्या विकासाचे व्हिजन ते कशा पद्धतीने मांडतात, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. बास्टेवाड हे नागपूर येथे मनरेगाचे आयुक्त होते. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी अशा पदांवर काम केल्याने प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्सचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. ते एक अनुभवी प्रशासकीय अधिकारी आहेत.