Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना लातूरमधून अटक

बीड जिल्ह्यातील सुमारे १५४ प्रकरणांमध्ये भूसंपादनाचे बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा आरोपाखाली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक करण्यात आली.


बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना लातूरमधून अटक

Land Scam Case |

१५४ प्रकरणांमध्ये भूसंपादनाचे बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप

लातूर (Land Scam Case) : बीड जिल्ह्यातील सुमारे १५४ प्रकरणांमध्ये भूसंपादनाचे बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा आरोपाखाली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक करण्यात आली. बीड येथील भूसंपादन बनावट मोबदला प्रकरणात यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भूसंपादन बनावट मोबदला प्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी संजय होगे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण, शेख अजहर शेख बाबू, त्र्यंबक पिंगळे, पांडुरंग पाटील, राऊत यांच्यासह काही वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

अविनाश पाठक हे बीड येथे जिल्हाधिकारी होते. बदली झाल्यानंतर त्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात मागच्या तारखेत सह्या करून घोटाळा करण्यात आला, अशा प्रकारचा गुन्हा बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत दाखल करण्यात आला होता. एकूण १० जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दहा जणांमध्ये बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक (रा. लातूर) यांचा समावेश आहे.

बीड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर अविनाश पाठक यांची मुंबईला मत्स्य आयुक्त म्हणून बदली झाली. तेथूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

सनदी अधिकारी म्हणून पाठक यांची आणखी दोन-तीन वर्षे सेवा आहे. मात्र त्यांच्यावरील गुन्हे व संशयास्पद प्रशासकीय कामकाज लक्षात घेऊन राज्य सरकारने कोणत्याच पदावर नियुक्ती न करता त्यांना प्रतीक्षेत ठेवले होते.

अटक कारवाई

दरम्यान गुरुवारी सकाळी केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा बीड येथील उपविभागाचा अतिरिक्त पदभार असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटरामन (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली बीड पोलिसांचे पथक लातुरात आले.

पाठक यांच्या हत्ते नगर येथील निवासस्थानातून त्यांना गांधी चौक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले व त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

लातूर पोलीस प्रशासनाचा अधिकृत दुजोरा

बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड येथील गुन्हा क्रमांक 544/2026 मधील निष्पन्न आरोपी नामे अविनाश प्रभाकर पाठक (वय 55 वर्षे), तत्कालीन जिल्हाधिकारी बीड, रा. हत्ते नगर, लातूर यांना गुरुवारी लातूर येथून कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सदर कारवाई मा. वेंकटरामन (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज तथा अतिरिक्त पदभार उपविभाग बीड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा तपशील

सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 316(5), 338, 336(3), 340(2), 198, 199, 316(2), 351(4) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 13 आणि मध्यस्थी व सलोखा कायद्यातील कलम 14, 34 अन्वये दाखल आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आज सकाळी बीड येथून विशेष पोलीस तपास पथक लातूर येथे दाखल झाले. या तपास पथकाने लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अविनाश पाठक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.