Baba Bageshwar protest: कुरुंदा येथे शिवप्रेमींनी बाबा बागेश्वर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. शिवाजी महाराज व इतर संतांच्या अवमानावर संताप व्यक्त केला.
कुरुंदा (Baba Bageshwar protest) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कुरुंदा येथे 26 एप्रिल ला रात्रीच्या सुमारास शिवप्रेमींनी बाबा बागेश्वर यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन केले व जोरदार निदर्शने केली. छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात “बागेश्वर महाराजांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिवप्रेमी अलोक इंगोले पाटील म्हणाले, “यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही महापुरुषांविरोधात अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आम्ही शासनाला देत आहोत.”
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला” या बाबा बागेश्वर (Baba Bageshwar protest) यांच्या विधानावर संताप व्यक्त करत इंगोले म्हणाले, “यापूर्वीही या भोंदूने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली व संपूर्ण संत परंपरेवर गरळ ओकली आहे. वारंवार अशी वक्तव्ये करून छत्रपतींचा इतिहास, संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार बदनाम करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका येते.”
बागेश्वर (Baba Bageshwar protest) यांचे वक्तव्य सुरू असताना व्यासपीठावर राज्यकर्तेही उपस्थित होते, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. “शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा सरकारलाही ते महागात पडेल,” असा इशारा आंदोलकांनी दिला. सरकार कारवाई करणार नाही, अशी शक्यता व्यक्त करत “आता सहन करून दुर्लक्ष करायचे की धडा शिकवायचा, हे शिवप्रेमी जनतेने ठरवावे” असे आवाहनही करण्यात आले. या निषेध आंदोलनाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.