नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी मंगळवारी मध्यरात्री कूरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयावर अचानक भेट देत व्यवस्थेची पाहणी केली.
कूरखेडा (Kurkhheda Hospital Inspection) : नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी मंगळवारी मध्यरात्री कूरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयावर अचानक भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. रात्री १२ ते १ वाजेदरम्यान झालेल्या या तपासणीत रुग्णालयातील स्वच्छता व एकूणच कारभाराबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान स्वच्छतागृह आणि शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याचे स्पष्ट झाले. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. यावर आमदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फटकारत तातडीने स्वच्छतेची पातळी सुधारण्याचे आदेश दिले.
आंतररुग्ण विभागात कूलरची व्यवस्था उपलब्ध असूनही ती कार्यान्वित नसल्यामुळे उकाड्यामुळे रुग्ण त्रस्त असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. या बाबत प्रशासनाला जाब विचारत तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी अयोग्य वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारींवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेने वागण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक औषधसाठा कायम ठेवणे आणि तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले.
दरम्यान, रुग्णालयासाठी मंजूर असलेले डायलिसिस सेंटर तयार होऊनही सुरू न झाल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली. आवश्यक यंत्रसामग्री व तज्ञांची नियुक्ती पूर्ण झाल्याने कोणताही विलंब न करता हे केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
या पाहणीवेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, रुग्ण कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे, तालुकाप्रमुख नगरसेवक आशिष काळे, सिराज पठाण, धनपाल मिसार, माजी नगरसेवक उसमान पठाण, भावेश मुंगणकर, आसिफ शेख, राकेश चव्हाण, सागर वाढई, वैद्यकीय अधिकारी मिथलेश आत्राम आदी उपस्थित होते.