Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जागतिक कविता दिन

जागतिक कविता दिनानिमित्त हिंगोलीत कवी संमेलन उत्साहात

World Poetry Day: हिंगोलीमध्ये जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात अनेक प्रसिद्ध कवींनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला चांगली दिशा दिली.


जागतिक कविता दिनानिमित्त हिंगोलीत कवी संमेलन उत्साहात

World Poetry Day |

हिंगोली (World Poetry Day) : मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोली व तवा प्रकाशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कविता दिनानिमित्त दि. 21 मार्च 2026 रोजी तुळसाबाई सोमानी एज्युकेशन ट्रस्ट हॉल येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम बनस्कर व ज्येष्ठ बालकवी कलानंद जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोडाती काळे यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी रतन आडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राधिका देशमुख यांनी केले.
या (World Poetry Day) कवी संमेलनात विविध कवी-कवयित्रींनी आपापल्या कविता सादर करून वातावरण साहित्यिक रंगात रंगवले. कवी तथा कथाकार गोडाती काळे यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवर आधारित कविता सादर करताना पुढील ओळी सादर केल्या.

“सीमेच्या काटेरी तारांवर
फडफडत होते झेंडे
वाऱ्याला विरोध करत
दिशा हरवलेल्या अवकाशात.”
ज्येष्ठ कवी तथा हायकुकार रतन आडे ‘बाळतान्हा’ यांनी पुढील कविता सादर केली –
*“वेडयाचे कान वेडे
ऐकती वेडी कविता
वेडयांचे मुख वेडे
आळवे वेडी कविता.”*
ज्येष्ठ कवयित्री तथा गझलकारा सुमन दुबे ‘स्वामिनी’ यांनी आपल्या कवितेतून भावस्पर्शी ओळी सादर केल्या –
“कल जब मेरी कविताएं पुनः पढी जाएंगी...
उनमें तुम्हारा नाम पढा जाएगा,
कविताओं का संबध खोजा जाएगा,
पंक्ति में बसी मन की संवेदनाओं को
खोजा जाएगा उनमें छिपा भाव,
और अर्थ ढूंढा जाएगा,
सार निकाला जाएगा।”
ज्येष्ठ स्त्रीवादी कवयित्री व समीक्षिका डॉ. राधिका देशमुख यांनी स्त्रीच्या वेदनेवर भाष्य करताना पुढील ओळी सादर केल्या –
*“प्रकाशलेल्या पायवाटा तिच्यासाठी नाहीत...
असं का वाटतं तिला?
रक्तबंबाळ होतील पाय,
होतील जखमा.
म्हणूनच ती निघते अंधारातच,
तिला माहित असते
तिच्या पावलाखालीच आहे प्रकाश...
तो करतो
तिची निर्दोष पायवाट
स्वप्नांकडे जाणारी...!”*
संत परंपरेतील अभंग रचनाकार पारिजात देशमुख यांनी अभंग सादर करताना पुढील ओळी मांडल्या –
“मन कल्पतरू, इच्छीत प्रगटे
सुगम गोमटे, कवितेने
शब्दांचे चातुर्य, बुद्धीही नेणती
स्वयं प्रसवती, कवितेने.”
कवी रघुवीर पतंगे यांनी मानवी स्वभावाचे चित्रण करताना पुढील ओळी सादर केल्या –
“सहारा शब्दांचा घ्यावा म्हणतो,
आशेला समज देण्यास जरासा.
मात्र दानशूर शब्दांची माणसे,
कधीचीच निघून गेली...”
कवयित्री अश्विनी देशमुख यांनी सुखाची व्याख्या पुढील ओळींतून मांडली –
“सुख म्हणजे काय?
एक आंतरिक जाण
आपल्याच जाणिवेतून आलेलं
एक सुखद वरदान...”
ज्येष्ठ बालकवी कलानंद जाधव यांनी निसर्गात साजरी होणारी रंगपंचमी लावणी ढंगात ‘कलगी तुरा’ सादर करताना पुढील ओळी मांडल्या –
“काटे सावरीचा संभार
भांगात भगवा सिंदूर
हार घालुनी गळा
पिकल्या चारांचा...”
कवयित्री विजया पतंगे यांनी पुढील ओळी सादर केल्या –
“ये सुगंधा ये जरासा,
शब्दास स्पर्शून जा.
ओळीतल्या कवितांच्या,
तनमनात भरून जा..”

कार्यक्रमाच्या (World Poetry Da) अध्यक्षीय समारोपात अध्यक्ष अशोक अर्धापुरकर यांनी विविध कालखंडानुसार कवितेत झालेल्या बदलांचा आढावा घेतला. कविता ही अस्वस्थतेतून जन्मते आणि वेदनेला संयमी भाषेत मांडणे म्हणजे कविता होय. काळानुसार कवितेचे स्वरूप सतत बदलत असते, असे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे राजाराम बनस्कर यांनी कवींना मार्गदर्शन करताना पुरस्कारांच्या मागे न लागता साहित्यनिर्मिती निष्ठेने करावी असे सांगितले. कोणी किती पुस्तके लिहिली यापेक्षा दर्जेदार साहित्यनिर्मिती अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.

या (World Poetry Day) कार्यक्रमास कलानंद जाधव, रतन आडे, गोडाती काळे, रघुवीर पतंगे, सुमन दुबे, डॉ. राधिका देशमुख, पारिजात देशमुख, अश्विनी देशमुख, विजया पतंगे, गौरी गुंडेवार, दर्शना भुरे यांच्यासह अनेक कवी-कवयित्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन शिंदे, संतोष ससे आणि आशुतोष देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित या कवी संमेलनामुळे हिंगोलीच्या साहित्यविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related to this topic: