Rojgar Hami Yojana: सेनगावातील कापडसिंगी ग्रामपंचायतीत रोजगार हमी व लाभार्थी योजनांमध्ये गैरव्यवहाराचा प्रकार उघड. ६ लाख ९२ हजार १५७ रुपयांची फसवणूक
दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
सेनगाव (Rojgar Hami Yojana) : तालुक्यातील कापडसिंगी ग्रामपंचायतीत शासनाच्या रोजगार हमी व लाभार्थी योजनांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला असून बनावट जॉबकार्ड, मास्टर कार्ड व मोजमाप कागदपत्रांच्या आधारे शासनाची तब्बल ६ लाख ९२ हजार १५७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कापडसिंगीचे ग्रामपंचायत अधिकारी अशोक रामकृष्ण मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोजगार सेवक आत्माराम किसन साबळे रा. कापडसिंगी व तांत्रिक सहाय्यक कालीदास भवानीदास देशपांडे रा. लोहगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rojgar Hami Yojana) फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १ जानेवारी २०२१ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत मौजे कापडसिंगी येथील विविध लाभार्थ्यांच्या योजनांच्या कामांवर संबंधित अधिकारी व रोजगार सेवकांनी देखरेख करणे आवश्यक असताना त्यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे.
तसेच शासनाला प्रत्यक्ष स्थिती कळविण्याऐवजी संगनमत करून लाभार्थ्यांचे मास्टर कार्ड, जॉबकार्ड, मूल्यांकन व मार्कआऊट सारखी कागदपत्रे बनावट तयार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे पाच लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देत शासन निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप असून एकूण ६ लाख ९२ हजार १५७ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या (Rojgar Hami Yojana) प्रकरणाची तक्रार व चौकशी अहवालानंतर अखेर सेनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत.