Thief Bike Accident: सोन्याचे गंठन हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. मात्र, पळ काढणारे हे चोर काही अंतरावरच रस्ता अपघाताचे बळी ठरले
कळमनुरीतील घटना; खिशात सापडला चोरीचा मुद्देमाल
कळमनुरी (Thief Bike Accident) : शहराच्या मुख्य रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास चेन स्नॅचिंगची (गंठन चोरी) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एच.डी.एफ.सी. बँकेसमोर पायी चालणार्या कळमनुरी शिवसेना शहर प्रमुखाची पत्नी चे गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. मात्र, पळ काढणारे हे चोर काही अंतरावरच रस्ता अपघाताचे बळी ठरले, ज्यामुळे त्यांचे बिंग फुटले.
रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील मारवाडी गल्ली येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय संतोषी संतोष सारडा या महिला आपल्या कुटुंबासह मुख्य रस्त्यावरील एच.डी.एफ.सी. बँकेसमोरून पायी जात होत्या. याच दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकल वर येऊन महिलेच्या गळ्यावर झडप घातली आणि सुमारे एक लाख रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठन (मंगळसूत्र) तोडून तीव्र वेगाने दुचाकीवरून पळ काढला.
या (Thief Bike Accident) अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेली महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी तातडीने कळमनुरी पोलीस ठाणे गाठले. गुन्हा करून पळून जाणार्या चोरांची दुचाकी मुख्य रस्त्यावरील रुशदा फंक्शन हॉलसमोर अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली. रस्ता अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस निरीक्षक जमीर नाईक व दिलीप पोले तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना अंबुलन्स चालक आप्पा कदम यांनी तात्काळ उपचारासाठी कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात आणले. ते संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता चोरांचे बिंग फुटले. हिसकावलेले सोन्याचे गंठन जसेच्या तसे एका चोराच्या खिशात आढळून आले.
पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. चौकशीत या चोरांची ओळख हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी गावचे रहिवासी विकास गौतम वाढे आणि रामा मोहन पठाडे अशी झाली आहे. रस्ता अपघातात दोन्ही आरोपींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कडक देखरेखीखाली असून कळमनुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कळमनुरी शहरात भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेण्याची घटना घडल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.