Kalamanuri water shortage: कळमनुरीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने तीव्र पाणीटंचाईच्या संकटात शहर सापडले आहे. नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे मुस्लिम सेवा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली (Kalamanuri water shortage) : कळमनुरी, नगर परिषदेच्या उदासीन कारभारामुळे कळमनुरी शहर सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडले आहे. नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ निलंबनाच्या कारवाईत गुंतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा (Kalamanuri water shortage) विस्कळीत झाला आहे. सध्या चार दिवस आड पाणीपुरवठा केला जात असून तोही अत्यंत अपुरा व अनियमित आहे. अनेक वसाहतींमध्ये पाईपलाईन फुटल्याने पाण्याची गळती होत आहे, मात्र दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. परिणामी अनेक भागात दहा दहा दिवसापासून पाणीपुरवठा झाला नाही महिला, वृद्ध व लहान मुलांना पाण्यासाठी लांबवर भटकावे लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पाणी हा मूलभूत हक्क असूनही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनता पाण्याच्या समस्येने हैराण असताना नगर परिषद प्रशासन मात्र स्वस्थ असल्याची संतप्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी व (Kalamanuri water shortage) पाणीप्रश्न तातडीने सोडवावा या मागणीसाठी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने उद्या सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. गरजेच्या भागात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा,खराब झालेल्या व फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी, पाणीटंचाईस जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी व कारभारात पारदर्शकता आणावी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शेख आमेर यांनी दिला.