औसा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय 3 रे न्यायाधीश श्रीमती एस. एच. नलावडे यांनी महत्वाचा निर्णय देत पूजा, यात्रा तसेच भजन-कीर्तन करण्याची मागणी करणारा दावा नुकताच फेटाळून लावला.
औसा येथील दिवाणी न्यायालयाचा निकाल
लातूर (Ausa Civil Court) : औसा तालुक्यातील हरेगाव येथील दर्गा न्यायतुल्लाह शहा खादरी आणि दर्गा मोहम्मदसाब बुखारी यांच्या संदर्भातील जमीन सर्वे नं. 77, 78, 79/2 बाबत दाखल करण्यात आलेल्या दिवाणी प्रकरणात औसा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय 3 रे न्यायाधीश श्रीमती एस. एच. नलावडे यांनी महत्वाचा निर्णय देत पूजा, यात्रा तसेच भजन-कीर्तन करण्याची मागणी करणारा दावा नुकताच फेटाळून लावला.
हरेगाव येथील काही लोकांनी सदरील ठिकाणी "नामदेव मंदिर" असल्याचा दावा करत गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ वंशपरंपरेने पूजा, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तन व प्रवचन करण्याचा अधिकार असल्याचे नमूद करून धोंडीबा रामा काटे व रामहरी धोंडीबा काटे यांनी सदरील जमिनीचे मूळ हक्कदारांचे वारस सय्यद फारूक महेमूद इनामदार व इतर यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र. 839/2021 दाखल केला होता.
सदर प्रकरणात (Ausa Civil Court) अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, या विषयावर यापूर्वीच विविध न्यायालयांमध्ये तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत अंतिम निर्णय झालेला असल्यामुळे या न्यायालयास त्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे धोंडीबा रामा काटे व रामहरी धोंडीबा काटे यांचा दावा नामंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दि. 02/03/2026 रोजी जाहीर करण्यात आला. या प्रकरणात प्रतिवादी सय्यद फारुक महमूद इनामदार यांच्यावतीने एडवोकेट पी.जी. गलाले पाटील यांनी बाजू मांडली.
सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता वाद...
सदर वाद यापूर्वीच विविध न्यायालयांमध्ये सुनावणीस गेला होता. मे. दिवाणी न्यायालय औसा, जिल्हा न्यायालय लातूर तसेच मे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रकरण चालल्यानंतर हा वाद अंतिम निर्णयासाठी सुप्रीम कोर्ट, दिल्लीपर्यंत पोहोचला होता.
त्या (Ausa Civil Court) निकालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, सदरील ठिकाणी नामदेव मंदिर किंवा एकनाथ मंदिर नसून तेथे दोन दर्गे आहेत. तसेच सदरील जमिनी निजाम काळापासून सय्यद फारूक महेमूद इनामदार यांचे पूर्वज हेच हक्कदार होते व आहेत, असा महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवण्यात आला होता. त्यानुसार सदरची जमीन व दर्गा सय्यद फारूक महेमूद इनामदार व इतर यांच्या ताब्यात देण्यात यावेत, असा निर्णय यापूर्वीच देण्यात आलेला आहे. तथापि, त्यानंतरही धोंडीबा रामा काटे व इतरांनी पुन्हा सदरील ठिकाणी पूजा व यात्रा करण्याची परवानगी मिळावी म्हणून दावा दाखल केला होता.