Jintoor Municipal Council: परभणीतील जिंतूर नगर परिषदेने मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत
तीन दिवसांत बंद करण्याचे आदेश; मोकळ्या जागेवरील अनधिकृत दारू विक्रीवर प्रशासनाचा बडगा
परभणी (Jintoor Municipal Council) : जिंतूर येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नगर परिषदेकडून संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित दुकान सील करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गुरूवार २३ एप्रिल रोजीच्या नोटीस नुसार देण्यात आला आहे.
नगर परिषद कार्यालय, जिंतूर (Jintoor Municipal Council) यांच्याकडून गुरूवार २३ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मोकळी जागा क्रमांक १९ व २० वर अनधिकृतपणे ‘देशी व विदेशी दारू विक्री (सदानंद वाईन शॉप)’ नावाने व्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या संदर्भात अर्जदार अविनाश श्रीरंग घ्याळ यांच्यासह विविध पत्रव्यवहार आणि पोलीस स्टेशन जिंतूर यांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने (Jintoor Municipal Council) स्पष्ट केले आहे की, नगर परिषद मालकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करण्यास ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित व्यवसाय हा पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटीसमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत अवैध व्यवसाय बंद करून जागा मोकळी करावी. अन्यथा नगर परिषद प्रशासनाकडून थेट कारवाई करून सील करून हटविण्यात येईल आणि त्याचे सर्व परिणाम संबंधित व्यक्तीवर राहतील. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.