Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्हा परिषद इमारत

जि.प. नूतनीकरणात बेफिकिरीचा कहर, लाखो रुपयांचे फर्निचर पावसात भिजले; कारवाईबाबत प्रशासन मौन

Hingoli Zilla Parishad Building: जिल्हा परिषद इमारतीच्या नूतनीकरणासाठी मागील वर्षी तयार केलेल्या फर्निचरांचा बाहेर काढून ठेवण्यात आला. पावसाळ्यामुळे त्यांना नुकसान झाले


जिप नूतनीकरणात बेफिकिरीचा कहर लाखो रुपयांचे फर्निचर पावसात भिजले कारवाईबाबत प्रशासन मौन

Hingoli Zilla Parishad |

हिंगोली (Hingoli Zilla Parishad Building) : जिल्हा परिषद इमारतीच्या नूतनीकरण कामातील बेजबाबदारपणामुळे शासकीय तिजोरीला लाखोंचा फटका बसला आहे. अर्थ विभागाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदाराने मागील वर्षी सुमारे 5 लाख रुपये खर्च करून तयार केलेले टेबल व इतर कार्यालयीन फर्निचर थेट इमारतीबाहेर उघड्यावर हलवून ठेवले. पावसाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभर झालेल्या पावसात हे सर्व फर्निचर भिजून पूर्णपणे निकामी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कॅबिनचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. या (Hingoli Zilla Parishad) कामासाठी अर्थ विभागातील फर्निचर बाहेर काढण्यात आले. मात्र ते सुरक्षित गोदामात किंवा शेडमध्ये ठेवण्याऐवजी कंत्राटदाराने इमारतीच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत रचून ठेवले. कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही पावसापूर्वी फर्निचर हलवले गेले नाही. परिणामी, लाकडी टेबल, खुर्च्या आणि कपाटे पाणी शोषून फुगली असून प्लायवूडचे थर निघाले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे फर्निचर ऐन पावसाळ्यात उघड्यावर टाकल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच हे फर्निचर नवीन तयार करण्यात आले होते. त्याचा वापर एक वर्षही पूर्ण झाला नाही आणि ते वापरण्याआधीच खराब झाले.

या प्रकारानंतर (Hingoli Zilla Parishad) जिल्हा परिषद वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांत या जुन्या इमारतीच्या किरकोळ दुरुस्ती आणि नूतनीकरणावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतल्यास, त्या रकमेत जिल्हा परिषदेची सुसज्ज नवीन इमारत सहज उभी राहिली असती, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. मूळ इमारतीच्या स्ट्रक्चरल दुरुस्तीला प्राधान्य न देता केवळ दर्शनी भाग आणि कॅबिनच्या नूतनीकरणावरच वारंवार निधी खर्च केला जात असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरून नुकसानीची वसुली केली जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी यावर मौन बाळगून असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. या घटनेने नूतनीकरण कामांमधील समन्वयाचा अभाव, देखरेख यंत्रणेचे अपयश आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.