Jambhul Bet Tourism Development: विधानसभा मतदार संघाला लाभलेले निसर्गाचे अनमोल वरदान असलेल्या जांभूळ बेट या पर्यटनस्थळाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी आ. डॉ.रत्नाकर गुट्टे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आ. डॉ. गुट्टे यांची दिल्लीत चर्चा
शासनाच्या स्वदेश योजनेअंतर्गत जांभूळबेटचा समावेश करण्याची मागणी
परभणी (Jambhul Bet Tourism Development) : गंगाखेड येथे विधानसभा मतदार संघाला लाभलेले निसर्गाचे अनमोल वरदान असलेल्या जांभूळ बेट या पर्यटनस्थळाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन जांभूळ बेटाचा केंद्र शासनाच्या स्वदेश योजनेअंतर्गत समावेश करून त्याचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याबाबत चर्चा केली आहे. या भेटीत युवा उद्योजक सुनील गुट्टे ही उपस्थित होते.
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पालम तालुक्यात असलेल्या जांभूळ बेट परिसरासाठी सर्वसमावेशक विकास आराखड्याची आवश्यकता अधोरेखित करून दर्जेदार रस्ते, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता, पर्यावरणपूरक पर्यटन, नौकाविहार, विश्रांती केंद्रे, माहिती केंद्र, स्थानिक हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा जपणारे उपक्रम यांचा समावेश असलेला विकास आराखडा उभारण्याबाबत सकारात्मक विचार विनिमय केला. या पर्यटन स्थळाचा विकास हा मनोरंजनाचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे प्रभावी विकास माध्यम असल्याच्या भूमिकेतून जांभूळ बेटाच्या विकासाची संकल्पना मांडण्यात आली. नैसर्गिक संपदा, पर्यावरणीय समृद्धी आणि पर्यटनक्षम वैशिष्ट्ये लाभलेल्या या स्थळाचा वैज्ञानिक पद्धतीने विकास झाल्यास गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पालम तालुका मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो असाही विश्वास यावेळी आ. डॉ. गुट्टे यांनी व्यक्त केला.
जांभूळ बेटाचा विकास (Jambhul Bet Tourism Development) केवळ पर्यटनाच्या दृष्टीने नव्हे तर स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी, लघु उद्योजकांना प्रोत्साहन आणि ग्रामीण बाजारपेठेला चालना देणारा ठरेल असे मत मांडत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थचक्र गतिमान करण्याची मोठी क्षमता जांभूळ बेटामध्ये असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले. जांभूळ बेटाचा विकास पूर्णतः पर्यावरणपूरक आणि शाश्वत तत्त्वांवर आधारित असावा यावर विशेष भर देण्यात आला. स्थानिक नागरिकांचा सहभाग जैव विविधतेचे संवर्धन आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून पर्यटन वाढविण्याचा दृष्टिकोनच भविष्यातील विकासाचा पाया ठरेल असेही आ. डॉ. गुट्टे यांनी सांगितले.