केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्या 22 कोटीच्या पांढऱ्या हत्तीचे करायचे काय... ?
घोट (Jal Jeevan Mission) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या दोन महिन्यांतच बंद पडलेली ही योजना गेल्या सात महिन्यांपासून कार्यरत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून ‘हर घर जल’ हे ध्येय ठेवून जल जीवन मिशन राबविण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र घोट परिसरात ही योजना प्रत्यक्षात अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. योजना सुरू झाल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच पाणीपुरवठा खंडित झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
नळयोजना बंद पडल्यामुळे महिलांना व नागरिकांना दररोज दूरवरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच गंभीर बनली असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेली योजना अल्पावधीतच निष्क्रिय ठरणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.
जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देणे, दररोज प्रति व्यक्ती किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे आणि सातत्यपूर्ण सेवा देणे हे महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र घोट परिसरात गेल्या सात महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने या सर्व निकषांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
दरम्यान, “२२ कोटींच्या या पांढऱ्या हत्तीचे आता करायचे तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नळयोजना तात्काळ सुरू करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी घोट परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.