२८ मार्चपासून यंदाच्या आयपीएल क्रिकेट हंगामाचा बिगुल वाजला असून, क्रिकेटच्या या उत्सवासोबतच जिल्ह्यात सट्टेबाजीचा बाजारही तेजीत आला आहे.
३० हून अधिक बुकी सक्रिय, कोडवर्डच्या जाळ्यात कोट्यवधींची उलाढाल, प्रभावी 'रेड' न झाल्याने सट्टेबाजांचे नेटवर्क मजबूत
यवतमाळ (IPL Betting Racket) : २८ मार्चपासून यंदाच्या आयपीएल क्रिकेट हंगामाचा बिगुल वाजला असून, क्रिकेटच्या या उत्सवासोबतच जिल्ह्यात सट्टेबाजीचा बाजारही तेजीत आला आहे. यवतमाळ शहर आणि ग्रामीण भागातच नाही तर यवतमाळ मधून परराज्यातील सट्टा लावला जातो आहे. सट्ट्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून, तब्बल ३० पेक्षा जास्त बड्या बुकींच्या माध्यमातून हा काळा बाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यवत्ामाळ जिल्हा सध्या आयपीएलचे बेटिंग हब म्हणून ओळखला जात आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिसांकडून कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई न झाल्यामुळे यंदा सट्टेबाजांचे धाडस अधिकच वाढले आहे.मागील वर्षी आयपीएल दरम्यान काही ठिकाणी छापेमारी झाली होती, परंतु ती कारवाई केवळ नावापुरतीच ठरली. मुख्य बुकींपर्यंत पोलिसांचे हात पोहोचलेच नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात एकही मोठी किंवा प्रभावी 'रेड' न झाल्याने सट्टेबाजांचे नेटवर्क आता अधिक मजबूत झाले आहे. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि दुसरीकडे हवाल्याचे जाळे यामुळे या गुन्हेगारीचा बीमोड करणे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
हायटेक झाली सट्टेबाजी: मोबाईल ॲप आणि कोडवर्डचा वापर
पोलिसांची नजर चुकवण्यासाठी सट्टा चालकांनी आता जुन्या पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. सट्टेबाजांनी स्वतःची खास 'मोबाईल अ?ॅप्स' तयार केली आहेत. या अ?ॅप्समध्ये थेट प्रवेश मिळत नाही; त्यासाठी बुकींकडून एक 'युआरएल लिंक' दिली जाते. या लिंकद्वारे लॉग-इन केल्यानंतर सट्टेबाज सक्रिय होतात. व्यवहारात गुप्तता पाळण्यासाठी विविध प्रकारचे कोडवर्ड वापरले जात आहेत. एखादा व्यवहार झाला की, त्याचे पैसे लगेच न देता आठ दिवसांनंतर देण्याची पद्धत रूढ झाली आहे, जेणेकरून तातडीने कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये.
प्रतिष्ठितांचाही सट्ट्यात सहभाग
या अवैध व्यवसायाने केवळ गुन्हेगारी क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील प्रतिष्ठित वर्गालाही विळख्यात घेतले आहे. लाखो-कोट्यवधींची उलाढाल होणार्या या सट्टेबाजीत शहरासह जिल्ह्यातील अनेक नावाजलेले व्यापारी आणि काही प्रतिष्ठित नागरिकही पडद्यामागून सहभागी असल्याची चर्चा आहे. ऑनलाईन वेबसाइट्समुळे आता कोठूनही सट्टा लावणे सोपे झाले असल्याने, या व्यवसायाची व्याप्ती जिल्ह्याच्या कानाकोपर्यात पोहोचली आहे.
असा चालतो सट्ट्याचा 'खेळ'
आयपीएल सामन्यावरचा सट्टा प्रामुख्याने फोन आणि अ?ॅपद्वारे घेतला जातो. सामन्याच्या स्थितीनुसार सट्टेबाजीचे दर सतत बदलत असतात. यामध्ये कधी ५० रुपयाला १ हजार, तर कधी ५०० रुपयाला १० हजार रुपये असे आमिष दाखवले जाते. बुकी किंवा एजंट एका मुख्य ठिकाणाहून या सर्व दरांवर नियंत्रण ठेवतात.
बॉल-टू-बॉल आणि विकेटवर सट्टा
सट्टेबाजी आता केवळ संघ जिंकण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. चेंडूगणिक धावा किती होतील, पुढच्या चेंडूवर विकेट पडेल का, पहिल्या पाच किंवा दहा षटकांत किती धावसंख्या होईल, यावरही मोठ्या रकमा लावल्या जात आहेत. सामन्याच्या निकालासोबतच वैयक्तिक खेळाडूंच्या कामगिरीवरही सट्टा लावला जातो, ज्यामुळे प्रत्येक मिनिटाला कोट्यवधींची उलाढाल होत असते.
हवाल्याच्या माध्यमातून कोट्यवधींचे ट्रांजॅक्शन
या सट्टेबाजांनी आर्थिक व्यवहारांसाठी 'हवाला' या छुप्या मार्गाचा अवलंब केला आहे. हवाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करणे सोपे जाते आणि बँकिंग व्यवहार नसल्याने पोलिसांच्या कारवाईचा धोकाही कमी असतो. यासाठी विशेष मध्यस्थ व्यक्ती सक्रिय असून, मार्केटमध्ये सट्ट्याचा पैसा छुप्या मार्गाने फिरवला जात आहे. काही लहान व्यवहारांसाठी छोट्या बँकांचाही वापर केला जात असल्याचे समजते.