योग ही भारताची प्राचीन आणि पारंपरिक उपचार पद्धती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले.
वर्धा (International Yoga Day) : योग ही भारताची प्राचीन आणि पारंपरिक उपचार पद्धती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता आणि नावलौकिक मिळाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा येथील तालुका क्रीडा संकुलात जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण व आरोग्य विभाग, माय भारत केंद्र, पतंजली योग समिती आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, योग ही केवळ उपचार पद्धती नसून निरोगी शरीर, मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवनाचा मंत्र आहे. प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा. तसेच यंदा पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आतापासूनच पाणी बचत आणि नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तालुका क्रीडा संकुलाच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित कार्यक्रमात महिला, मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि उपस्थित मान्यवरांनी सामूहिक योगासने केली.
पतंजली योग समितीचे दामोदर राऊत, मोहन काळे आणि प्रशांत सावरकर यांनी योगाचे महत्त्व सांगत उपस्थितांकडून विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले.