Students Food Poisoning: धारणी उपजिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत शिजविलेले अन्नापासून विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन अस्वस्थता येण्याच्या संदेहात पाहुणे आहेत. जेवणानंतर ७० ते ८० विद्यार्थ्यांनी उलट्या,
सेंट्रल किचनमधून आलेल्या अन्नावर संशय; धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
धारणी (Students Food Poisoning) : धारणी तालुक्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रम शाळा, टिटंबा येथे शनिवारी रात्री जेवणानंतर मोठी दुर्घटना घडली. जेवण केल्यानंतर अचानक सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, शिळे अथवा दूषित अन्न सेवन केल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडताच आश्रम शाळा प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, टेंबली येथील (Students Food Poisoning) सेंट्रल किचनमधून टिटंबा आश्रम शाळेसह परिसरातील विविध आश्रम शाळांना दररोज शिजविलेले अन्न पुरविले जाते. याच सेंट्रल किचनमधून आलेल्या अन्नामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि अन्न नमुन्यांच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, टेंबली येथील सेंट्रल किचनच्या कामकाजाबाबत यापूर्वीही अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत तक्रारी होत असल्याची चर्चा परिसरात होती. या घटनेनंतर त्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित अन्नपुरवठादार, सेंट्रल किचन व्यवस्थापन आणि जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.