वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील धक्कादायक घटना; अनैतिक संबंधांच्या संशयातून छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय ज्ञानेश्वर मदने याच्यावर पत्नी दीपाली हिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ज्ञानेश्वर मदने याच्यासह त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेत अटक केली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे 3 वाजता ज्ञानेश्वरने दीपाली घरात पडल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना फोनवरून दिली. मात्र या प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर दीपालीचे कुटुंबीय मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून तातडीने कारंजाकडे रवाना झाले. सायंकाळी सुमारे 7 वाजता ते कारंजा येथे पोहोचले.
दीपालीचा भाऊ राहुल माने यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश्वरचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत, त्याच कारणावरून तो दीपालीचा सातत्याने छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वादातून काही महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुंबांची बैठकही झाली होती. त्यावेळी प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही दीपालीचा कथित छळ सुरूच राहिल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विशेष म्हणजे, मृत दीपाली ही सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेने शिवनगर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास कारंजा शहर पोलीस करत असून हत्येच्या आरोपामागील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.