Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

सोमेश्वर पुसतकर पुरस्कार

स्वराज्य सेवा  प्रतिष्टान' ला २०२६ चा सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार

Someshwar Pusatkar Award: विदर्भातील ऐतिहासिक किल्ले , प्राचीन मंदिरं, शेकडो वर्ष जुन्या विहिरी, बारव  व जुन्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संवर्धन करण्यासोबतच त्या ऐतिहासिक वास्तूंचा देदीप्यमान


स्वराज्य सेवा  प्रतिष्टान ला २०२६ चा सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार

Someshwar Pusatkar Award |

 

एक लाख रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवणार

अमरावती (Someshwar Pusatkar Award) : विदर्भातील ऐतिहासिक किल्ले , प्राचीन मंदिरं, शेकडो वर्ष जुन्या विहिरी, बारव  व जुन्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संवर्धन करण्यासोबतच त्या ऐतिहासिक वास्तूंचा देदीप्यमान  इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहचविणाऱ्या व या कामात शेकडो तरुणांना सहभागी करून घेणाऱ्या  स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या संस्थेची २०२६ च्या सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  एक लाख रुपये , मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी, आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे कर्तेधर्ते दिवंगत सोमेश्वर पुसतकर (Someshwar Pusatkar Award) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या  व्यक्ती वा सामाजिक संस्था वा संघटनेला दरवर्षी लोकगौरव पुरस्कार दिला जातो. येत्या २ ऑगस्टला श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात  मराठी विद्यापीठाचे कुलगुरु अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू, कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, 'वनराई' चे विश्वस्त माजी आमदार गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे .

सोमेश्वर पुसतकर (Someshwar Pusatkar Award) यांनी आपल्या हयातीत शेकडो गरजू लोकांना मदत केली. जात -पात , धर्म , विचारधारा , संघटना याचा विचार न करता त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना कायम ताकत देण्याचे काम केले होते . पुसतकर यांच्या कार्याचा वारसा चालत राहावा आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बळ मिळावे ,यासाठी लोक फाऊंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान, आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ, न्यू आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ व सोमेश्वर पुसतकर मित्रमंडळ  या संस्थांच्या वतीने दरवर्षी पुसतकर यांच्या स्मृतीदिनी हा पुरस्कार देण्यात येतो .सन  २०२१ मध्ये  'नानक रोटी ट्रस्ट' , २०२२ ला  श्री. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल तर २०२३ यावर्षी रक्तदान समिती, २०२४ ला 'तपोवन'  तर  २०२५ ला 'वसा'   या संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

'स्वराज्य सेवा प्रतिष्टान ' चे अनोखे काम

२०२६ च्या पुरस्कारासाठी  निवड झालेल्या  स्वराज्य  सेवा प्रतिष्टानची स्थापना चांदूर बाजार येथील शिवा श्रीकृष्णराव काळे यांनी  केली .  छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरं, शेकडो वर्ष जुन्या विहिरी, बारव व इतर ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन करण्यासोबत  सर्वसामान्य जनतेला इतिहासाची माहिती देऊन त्यांना या कामात सहभागी करून घेते .संस्थेतर्फे मेळघाटातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यावर दरवर्षी डिसेंबर महिन्यात गाविलगड शौर्य दिन साजरा केला जाते . त्या दरम्यान संपूर्ण विदर्भातून तरुण एकत्रित येऊन किल्ल्यात पदभ्रमण करून संपूर्ण किल्ल्याची स्वच्छता करतात . या दरम्यान 'प्लॅस्टिकमुक्त गाविलगड'  मोहीमही राबवली जाते.

संस्थेतर्फे विदर्भातील नरनाळा , माहूर , लासूर, रिद्धपूर, कारंजा लाड, रामटेक , कुवारा भीमसेन , रामटेक , नगरधन, आमनेर  अशा  वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी तरुणांसाठी अभ्यास दौरे आयोजित केले जातात.  या ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता व तिथे श्रमदान  मोहीम नियमितपणे राबवली जाते . महिमापूर येथील   यादवकालीन सात मजली विहिर, रिद्धपूर येथील सासू सुनेची  विहिर, अचलपूर येथील सुलतान गढी स्वच्छता , तळेगाव दशासर येथील विहीर, बुलडाणा जिल्ह्यातील किल्ले मैलगड येथे श्रमदान अशा अनेक मोहीम संस्थेतर्फे नियमित राबविल्या जातात. शोध मोहिमेअंतर्गत भोरकप येथील ३० हजार वर्ष जुनी रॉक पेंटिंग, गायमुख येथील अश्मयुगीन चित्रांचा शोध , सालबर्डी येथील पांडव लेणी व पांडव कचेरी शोध , खटकाली येथील राणी महाल शोध अशा अनेक मोहिमा संस्थेने यशस्वीपणे पूर्ण केल्या .संस्थेतर्फे पर्यावरण विषयातही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन होते , तसेच नवीन पिढीचा या संपूर्ण कामात सहभाग वाढावा यासाठी विदर्भातील    शाळा - महाविद्यालयांमध्ये गड -किल्ल्यांची  छायाचित्रे तसेच शिवकालीन शस्त्रात्र व जुन्या नाण्यांचे  प्रदर्शन आयोजित केले जाते.

अध्यक्ष शिवा काळे यांच्यासोबत सचिव प्रतीक पाथरे , प्रफुल्ल रुईकर , नितीन धर्माळे , धनराज अढाऊ , प्रथमेश बहेकार , चेतन बेलसरे , गौरव येवले , अंकुश गायकवाड , गोकुळ सोलकर , राहुल पंडित , नारायण वाकोडे , हरीश प्रागृत, सागर अंभोरे, धीरज मेटकर, राहुल भलावी, हर्ष गोयंका, गणेश टाले, पंकज कदम, वैभव येरने, संकेत पवार, कृष्णा धांडे, श्रवण लांबट, ओंकार पितळे, योगेश रायजादे, सूरज इंगोले, कार्तिक राऊत, अंकित देशमुख, हरीश गावंडे, मंगेश तुमसरे, वेदांत वासनिक, नितीन मांडेकर, प्रशांत साबळे, पृथ्वीराज धवल, राकेश महल्ले, शंतनु ठाकरे, शुभम पांधे, उमेश आलोकर हितेश डफ, मंगेश केचे आदी तरुणांचा हे संपूर्ण कार्यक्रम व मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग  असतो .संस्थेच्या वाटचालीत प्रा. पृथ्वीराजसिंह राजपूत ,प्रा. एकनाथ तट्टे, अतुल गुरु, प्रशांत लहाने, विकास बांबल, विकास आढे,राजेश टावरी,  विनोद तट्टे शशांक लावरे आदी मान्यवरांचे नियमित मार्गदर्शन असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमा व उपक्रमांची आखणी केली जाते.