Solar project tree slaughter: हिंगोलीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वन विभागाने 1200 एकर जंगलात झाडे बेकायदेशीरपणे तोडले गेले. शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आणि वन्यजीवांचा अधिवास खंडित
प्रकल्प रद्द करण्याची विराट राष्ट्रीय लोक मंचची मागणी
हिंगोली (Solar project tree slaughter) : हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे प्रस्तावित 200 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वन विभागाच्या 1200 एकर क्षेत्रातील 50 वर्षे जुनी हजारो झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून शेतकऱ्यांचे पारंपरिक रस्तेही बंद झाले आहेत.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीकडून हरित ऊर्जेच्या नावाखाली घनदाट जंगलातील वृक्षसंपदा नष्ट करण्यात आली. त्यामुळे वन्यजीवांचे अधिवास संपून प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
या कृतीमुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 48-अ, 51-अ (छ) व 21 सह वन संवर्धन कायदा 1980, भारतीय वन कायदा 1927, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, जैवविविधता कायदा 2002, वन हक्क कायदा 2006 व भूसंपादन कायदा 2013 या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टी. एन. गोदावर्मन व एम. सी. मेहता निकालानुसार वनसंरक्षण हे सर्वोच्च सार्वजनिक हित आहे.
या (Solar project tree slaughter) प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व परवानग्या सार्वजनिक कराव्यात, बेकायदेशीर वृक्षतोडीचा पंचनामा जाहीर करावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, काम तात्पुरते स्थगित करावे, नुकसानभरपाई वनीकरण करावे व शेतरस्ते त्वरित खुले करावेत, अशी मागणी शेख नईम शेख लाल संस्थापक असलेल्या संघटनेने केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, वन मंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद, जिल्हाधिकारी हिंगोली व विभागीय वनसंरक्षक हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विराट राष्ट्रीय लोक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हाध्यक्ष शेख बासीत महेबुब, उपाध्यक्ष रवी जैस्वाल, शहर अध्यक्ष शेख आवेज महेमुद, जिल्हा महासचिव पठाण साजीद खान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.