Hingoli Smart Meter: हिंगोलीतील ग्राहकांच्या कळून मिळालेल्या स्मार्ट मीटर वाढीव वीज बिलांबाबत तात्काळ तक्रारांचा निपटारा करण्यासाठी महावितरण विभागाने विशेष केंद्र सुरू केले.
हिंगोली (Hingoli Smart Meter) : स्मार्ट मीटरच्या सक्ती आणि वाढीव वीज बिलांविरोधात ११ ऑगस्ट रोजी वीज ग्राहक संघटनेने हिंगोलीतील मंडळ कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. या आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या हिंगोली उपविभागाने ग्राहकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता कार्यालयाकडून आज कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.
वीज बिलासंबंधी आणि इतर प्राप्त होणाऱ्या तक्रारी विहीत वेळेत निकाली काढाव्यात या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या कामकाजासाठी सहायक अभियंता रोशनी वंजारी, उच्चस्तर लिपिक रमेश सुर्यवंशी तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ कल्पना पाठक आणि नागेश हुरडुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांची कामाचे ठिकाण हिंगोली उपविभाग कार्यालय असेल.
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी तात्काळ स्वीकारून त्यांचे निस्तारण करावे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी त्या संबंधित कार्यालयाकडे हस्तांतरित करून त्याचा दैनंदिन अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे बंधनकारक राहील. स्मार्ट मीटर आणि वीज बिलांबाबत नागरिकांच्या मनातील असंतोष दूर करण्यासाठी आणि तक्रारींचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी महावितरणने उचलले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.