विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चाकूर (जि. लातूर) येथे २० जुलैपासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
चाकूर : विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चाकूर (जि. लातूर) येथे २० जुलैपासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी (२९ जुलै) देखील त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ दोन शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास कमानीवर चढून आपला जीव धोक्यात घालून आंदोलन केले.
आमरण उपोषणादरम्यान दहाव्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने दोन शेतकरी चाकूर येथील कमानीवर चढले. यावेळी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची तयारी केल्याची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या वाहनाच्या मदतीने शिडी लावून पोलिसांनी कमानीवर चढत दोन्ही शेतकऱ्यांना सुरक्षित खाली उतरवून ताब्यात घेतले. याचवेळी दोघांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला.