राजकारणाच्या गदारोळात अनेकदा सत्ता, पदे आणि राजकीय समीकरणांचीच चर्चा रंगत असते.
सहकार मंत्र्यांनी समाजासमोर ठेवले माणुसकीचे भावूक आणि आदर्श उदाहरण
अहमदपूर : राजकारणाच्या गदारोळात अनेकदा सत्ता, पदे आणि राजकीय समीकरणांचीच चर्चा रंगत असते. मात्र, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतेच माणुसकीचे एक भावूक आणि आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. तब्बल ३५ वर्षे सातत्याने अतिशय प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या रज्जाक मामू शेख यांची 'विधान भवन' पाहण्याची वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण करत मंत्र्यांनी एका कष्टकऱ्याचा केलेला सन्मान सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या 'इंद्रायणी' निवासस्थानी रज्जाक मामू गेल्या साडेतीन दशकांपासून मुख्य स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या हातच्या चवीने मंत्र्यांना नेहमीच कामासाठी एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. रज्जाक मामूंच्या हातचे जेवण म्हणजे केवळ अन्न नसून ती सेवा आणि आपुलकीची अनुभूती असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील नेहमीच अभिमानाने नमूद करतात.
धावपळीचे जीवन, वाढते वय आणि जडलेले आजार यांचा विचार करता लोकांची सेवा करण्यासाठी स्वतः तंदुरुस्त राहणे आवश्यक असल्याचे मंत्री मानतात. या ऊर्जेमागे रज्जाक मामूंच्या सेवाभावाचा मोठा वाटा असल्याची त्यांची भावना आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या मुंबईतील विधान भवन प्रत्यक्ष आतून पाहण्याची रज्जाक मामूंची तीव्र इच्छा असल्याचे मंत्र्यांना समजले.
आपल्या सुख-दुःखात ३५ वर्षे साथ देणाऱ्या या सेवेकऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्री पाटील यांनी तात्काळ रज्जाक मामूंना मुंबईला आमंत्रित केले. स्वतः त्यांच्या सोबत राहून त्यांनी विधान भवनाची संपूर्ण सफर घडवून आणली. विधान भवनाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाताना रज्जाक मामूंच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आदर आणि कृतज्ञतेचे भाव पाहून उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला. कारण हे केवळ एका व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होणे नव्हते, तर एका साध्या कष्टकरी माणसाच्या प्रामाणिकपणाचा झालेला सर्वोच्च सन्मान होता.
'पद मोठं नसतं, तर माणूस मोठा असतो,' हा विचार केवळ भाषणापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून साकारत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी समाजाला संवेदनशीलतेचा नवा संदेश दिला आहे. एका साध्या स्वयंपाकी माणसाच्या छोट्याशा स्वप्नाला एवढे मोठे महत्त्व देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
रज्जाक मामूंच्या चेहऱ्यावरील हे सात्विक समाधान आपल्यासाठी कोणत्याही पदापेक्षा अधिक मोलाचे असल्याचे सांगत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या भावूक क्षणाचे वर्णन 'माणुसकीचा सोहळा' असे केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संपूर्ण मतदारसंघात तसेच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.