हुडकेश्वर परिसरातील शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी निर्भय पाखरेच्या अंमली पदार्थांशी संबंधित संपर्काचा शोध; मोबाईल न्यायवैद्यक तपासणीसाठी
नागपूर : हुडकेश्वर परिसरातील शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याने ठाणे येथून नागपुरात येताना तीन चाकू, सर्जिकल ब्लेड आणि कात्री सोबत आणल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या घटनेमागे पूर्वनियोजित कट होता का, या दिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिस तपासात आरोपीने घटनेपूर्वी आवश्यक साहित्य सोबत आणल्याचे समोर आले आहे. त्याने पीडितेला बांधून ठेवून अत्याचार केल्यानंतर तिच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या काळात आरोपीने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, याची शक्यताही तपासली जात आहे.
मात्र अंमली पदार्थ त्याला नेमके कुठून मिळाले, तसेच त्याचा यापूर्वी तस्करांशी संपर्क होता का, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अटकेनंतर आरोपीने आपल्या भ्रमणध्वनीचा गुप्त क्रमांक पोलिसांना दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल न्यायवैद्यक पथकाकडे तपासणीसाठी सोपवला आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. ठाण्याहून नागपुरात आल्यानंतर आरोपी कोणाच्या संपर्कात होता, याचा शोध घेणे पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान बनले आहे.
विमान प्रवासातून हत्यारे आणल्याचा संशय
घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे ठाण्याहून विमानाने नागपुरात आला होता. त्याच्यासोबत तीन प्रकारचे चाकू, सर्जिकल ब्लेड आणि कात्री असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही सामग्री त्याने विमानाच्या लगेजमध्ये ठेवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान ही हत्यारे स्कॅनरमध्ये कशी आढळली नाहीत, याचाही तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सुरक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.
आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी
हुडकेश्वर पोलिसांच्या कोठडीत असताना आरोपीने गुरुवारी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी रात्री त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर शनिवारी त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
तपासात असहकार्याची भूमिका
अटक झाल्यापासून आरोपी निर्भय पाखरे पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. त्याने डार्क वेबवरून माहिती मिळवून अत्याचार आणि हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय तपासणीसाठीही तो सुरुवातीला तयार नसल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपीने घटनेनंतर पसार होण्याची तयारी केली असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याने बुक केलेल्या परतीच्या प्रवासाच्या तिकिटाच्या नोंदीही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. घटनास्थळावरून तसेच आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगमधून अश्लील साहित्य, तीन चाकू, सर्जिकल ब्लेड आणि कात्री आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात आरोपीची पूर्वतयारी, डार्क वेबवरील हालचाली, अंमली पदार्थांचा संभाव्य संबंध, विमान प्रवासातून हत्यारे आणण्याची पद्धत आणि घटनेनंतरच्या हालचाली अशा विविध दिशांनी पोलिसांचा तपास सुरू आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करून संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा करण्याचे आव्हान हुडकेश्वर पोलिसांसमोर आहे.