Hingoli Swimming Pool: हिंगोलीत अर्धा उन्हाळा संपला तरी जलतरण तलाव सुरू न झाल्याने नागरिक व पालकांमध्ये नाराजी. शासनाने खर्च केलेल्या निधीचा काहीच उपयोग न झाल्याने तीव्र निषेध.
जलतरण तलाव बंदच; कोट्यावधींचा निधी पाण्यात
सुधीर गोगटे
हिंगोली (Hingoli Swimming Pool) : एप्रिल महिना संपत आला, अर्धा उन्हाळा उलटला तरी हिंगोली शहरातील बहुप्रतिक्षित जलतरण तलावाचा दरवाजा अद्याप उघडलेला नाही. दरवर्षी कडक उन्हाळ्यात नागरिक आणि विशेषतः लहान मुलांना दिलासा देणारा हा तलाव यंदा मात्र बंदच असल्याने जलतरणपटू व पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या जलतरण तलावाच्या बांधकाम व नूतनीकरणासाठी मागील काही वर्षांत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. अत्याधुनिक फिल्टर प्लांट, चेंजिंग रूम, प्रेक्षक गॅलरी अशा सुविधांसाठी मोठी तरतूद झाली. मात्र प्रत्यक्षात तलाव सुरू न झाल्याने 'कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला' अशी चर्चा शहरात रंगली आहे. उन्हाळी सुट्ट्या लागूनही पोहण्याचा आनंद मुलांना घेता येत नसल्याने पालक हताश झाले आहेत.
स्थानिक जलतरणपटू (Hingoli Swimming Pool) व प्रशिक्षकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तलाव खुला होतो. यंदा मात्र तांत्रिक कारणे, देखभाल-दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याचे सांगत प्रशासनाने वेळ मारून नेली. फिल्टरेशन यंत्रणा, पाणी शुद्धीकरण, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती यांसारखी कामे रखडल्याने तलाव सुरू करता आलेला नाही, असे सूत्रांकडून समजते. परिणामी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरेही रद्द करावी लागली असून जिल्ह्यातील उदयोन्मुख जलतरणपटूंचे नुकसान होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 'जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने तलाव सुरू करण्याचे आदेश द्यावेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही सुविधा मिळत नसेल तर याला जबाबदार कोण?' असा सवाल क्रीडा प्रेमींनी उपस्थित केला आहे. नगर परिषद प्रशासनाकडून मात्र 'लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून तलाव नागरिकांसाठी खुला करू' असे सांगण्यात येत आहे, परंतु निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना व नागरिकांना पोहण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने नाराजी वाढत आहे. खासगी (Hingoli Swimming Pool) जलतरण तलावांचे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीय शासकीय तलावावरच अवलंबून आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून उन्हाळा संपण्यापूर्वी तरी तलाव सुरू करावा, अशी आग्रही मागणी होत आहे. अन्यथा खर्च केलेला निधी वाया गेला, असा ठपका कायम राहील, अशी भावना व्यक्त होत आहे.