Hingoli Water Supply: हिंगोलीत १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला, नागरिकांना त्रास झाला आणि पाण्याच्या अभावामुळे आरोग्य समस्या उद्भवल्या.
हिंगोली (Hingoli Water Supply) : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विवेकानंद नगर, हिल टॉप कॉलनी, गोविंद नगर संन्मती कॉलनी यासह अन्य भागातील नागरिकांना तब्बल बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पाणीपुरवठा करण्यात आला. या काळात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.
हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या जल कुंभावरून अनेक नवीन व जुन्या वसाहतीमध्ये पाणीपुरवठा रोटेशन नुसार केला जातो.गोविंद नगर विवेकानंद नगर सन्मती कॉलनी हिल टॉप कॉलनी व इतर भागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल ला पाणीपुरवठा सोडण्यात आला होता. त्यानंतर डिग्रस कर्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात ट्रांसफार्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १२ दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्याने अनेकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. खासगी टँकरचालकांनी मनमानी दर आकारल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले. एक टँकर ८०० ते १२०० रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
या (Hingoli Water Supply) भागातील महिलांना सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागली. लहान मुलांना शाळेत पाठवणे, दैनंदिन कामे करणे यावरही परिणाम झाला. काही नागरिकांनी तर शेजारच्या भागातून पाणी आणून दिवस ढकलले. पाणीटंचाईमुळे परिसरात आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.
नगर परिषदेकडे काही नागरिकांनी चौकशी केली असता डिग्रस कर्हाळे येथील जनित्रा मधील तांत्रिक बिघाडीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळेत न झाल्याने नागरिकांना १२ दिवस पाण्याविना काढावे लागले. शनिवारी सकाळी कमी दाबाने का होईना, पण पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हा नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र पुरेसे पाणी न मिळाल्याने अनेकांच्या घरातील टाक्या अर्ध्याच भरल्या.
स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती असते. पाणीपुरवठ्याचे नियोजन आधी का केले जात नाही?" असा सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे.
दरम्यान, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा (Hingoli Water Supply) विभागाचे अभियंता म्हणाले की, "तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला. आता यंत्रणा पूर्ववत झाली असून यापुढे नियमित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील." मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या आश्वासनांवर अविश्वास दाखवला आहे. शहरातील इतर भागांतही अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.