Hingoli helmet compulsory: हिंगोलीमध्ये हेल्मेटची सक्ती लागू केल्यानंतर पहिल्या दिवशी ५११ वाहन चालकांवर कारवाई करून पाच लाख ११ हजार रुपये दंड वसूल केला गेला.
पहिल्या दिवशी 511 वाहन चालकाकडून पाच लाख 11 हजार रुपयांचा दंड वसूल
हिंगोली (Hingoli helmet compulsory) : हिंगोली जिल्हा पोलीस, वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली असून नियम मोडणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हेल्मेट सक्तीची घोषणा होताच शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली. अनेक दुकानांमध्ये हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, 'प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा व वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी (Hingoli helmet compulsory) हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, आता हेल्मेट न वापरणार्या वाहनचालकांची गाडी सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे किंवा थेट फोटो काढून नोंद केली जाईल. त्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दंड आकारला जाईल. हा दंड हेल्मेटच्या किमतीपेक्षा जास्त असणार असून तो भरणे बंधनकारक राहील. प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक शाखा व आरटीओचे पथक शहरातील प्रमुख चौक व महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरा, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
पहिल्या दिवशी तब्बल ५११ वाहन चालकावर कारवाई
हेल्मेट सक्ती (Hingoli helmet compulsory) करण्यात आली असल्याने हिंगोली शहर वाहतुक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून २२ एप्रिल संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली. खटकाळी बायपासवर मोहीमेत विना हेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तब्बल ४०३ तर हिंगोली शहर वाहतुक शाखेच्या पथकाने १०८ वाहन चालकावर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच लाख 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रत्येक वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून वाहने चालविणे आवश्यक आहे. विना हेल्मेट वाहने चालविणार्यावर कारवाई केली जाणार आहे. यापुढे अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.