Hingoli Gutkha Seized: हिंगोली शहरात पोलिसांनी अवैध गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. यात ४.९७ लाख रुपयांचा माल आणि दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
हिंगोली (Hingoli Gutkha Seized) : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका भाड्याच्या घरावर छापा टाकून तब्बल ४ लाख ९७ हजार ७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. (Hingoli Gutkha Seized) हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात एका इसमाने भाड्याने घेतलेल्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पेन्शनपुरा येथील संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणात साठवलेला साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, आर.के. सुगंधित पानमसाला, सुगंधित व्ही-१ तंबाखू, रजनीगंधा सुगंधित पान मसाला, असा एकूण ४,९७,०७२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना जाब विचारण्यासाठी ताब्यात घेतले आहे. आर्यन खान मुस्ताक खान रा. पेन्शनपुरा, शेख अझर शेख अनिस रा. आजम कॉलनी, हिंगोली, या दोघांसह आणखी एका आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही (Hingoli Gutkha Seized) यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस उपअधीक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे आणि त्यांच्या पथकाने किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, प्रशांत वाघमारे यांनी पूर्ण केली.