शहरामध्ये एका पाठोपाठ चोर्यांचे सत्र सुरू आहे.
हिंगोली (Hingoli Theft) : शहरामध्ये एका पाठोपाठ चोर्यांचे सत्र सुरू आहे. त्यातच आता कळमनुरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक हा नशेत असल्याची संधी साधून हिंगोलीतील गणेशवाडी जि.प. शाळेसमोरून अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळील १ लाख ५ हजार रुपयाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक गजानन शिवप्रसाद वाठोरे हे हिंगोलीतील रिसाला बाजार भागात वास्तव्यास असुन २७ मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास ते घरी येत असताना नशेमध्ये होते. या संधीचा फायदा अज्ञात दोन चोरट्यांनी घेऊन त्यांचा पाठलाग सुरू केला होता. त्यातच गणेशवाडी भागातील जिल्हा परिषद शाळे समोरील रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत वरिष्ठ सहाय्यक गजानन वाठोरे यांना नशेमध्ये डुलकी लागली. या डुलकीचा फायदा घेऊन त्यांचा पाठलाग करणार्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील १ लाख ५ हजार रुपयाच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन पलायन केले. या प्रकरणी २८ मार्चला हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात २ चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह डि.बी. पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्यासह पथकाने जाऊन पाहणी केली. परंतु चोरट्याचा मागोवा पोलिसांना लागला नाही. या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पथकाने पाहणी केली.