उन्हाळ्यात कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला असून धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
हिंगोली (Hingoli Ration Distribution) : येथील मसोबा गल्लीतील रास्त भाव धान्य दुकानदार नवनाथ कानबाळे यांच्या दुकानात शासनाच्या आदेशानुसार मे आणि जून २०२६ या दोन्ही महिन्यांचे अन्नधान्य एकत्रितपणे वाटप सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे उन्हाळ्यात कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला असून धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पारदर्शक वाटपावर भर
शासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा नियोजनाच्या अनुषंगाने दोन महिन्यांचे धान्य एकत्रित देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार म्हसोबा गल्लीतील केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने वाटप प्रक्रिया राबवली जात आहे. लाभार्थ्यांना गहू, तांदूळ आणि इतर शिधा वस्तू ई-पॉस (E-POS) मशीनद्वारे अंगठा घेऊन पारदर्शक पद्धतीने वितरित केल्या जात आहेत.
लाभार्थ्यांमध्ये समाधान
“दोन महिन्यांचा कोटा एकाच वेळी मिळाल्याने आम्हाला वारंवार दुकानात येण्याची गरज भासणार नाही. धान्य वेळेवर आणि योग्य प्रमाणात मिळत आहे,” असे एका महिला लाभार्थ्याने सांगितले.
धान्य वाटप प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दुकानदार नवनाथ कानबाळे यांनी विशेष नियोजन केले आहे. रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली असून, नियमानुसार धान्य मिळत असल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.