हिंगोली (Hingoli Police CCTNS) : सीसीटीएनएस कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गृह अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून फेब्रुवारी 2026 महिन्याचा आढावा घेतल्यानंतर हिंगोली घटकाला 201 पैकी 201 गुण मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याची 100% कामगिरी नोंदवली गेली आणि राज्यात हिंगोली जिल्हा अव्वल ठरला.
सप्टेंबर 2015 पासून महाराष्ट्रात कार्यान्वित असलेल्या (Hingoli Police CCTNS) सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाज हिंगोलीत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने चालते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारदारांची तक्रार ऑनलाईन घेऊन गुन्हा दाखल करणे आणि तपासाची सर्व माहिती सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरणे याला प्राधान्य दिले जाते. या प्रणालीद्वारे आरोपींचा पूर्व इतिहास तपासून प्रतिबंधक कारवाईही केली जाते.
जिल्ह्यात सीसीटीएनएस (Hingoli Police CCTNS) नोडल अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे कामकाज पाहतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक किंवा दोन अंमलदारांना सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले असून देखरेख अधिकारीही नियुक्त केले आहेत. या सर्वांना दर महिन्याला सीसीटीएनएस शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू हमाने, पोलीस अंमलदार राहुल तडकसे आणि महिला पोलीस अंमलदार पुजा जाधव यांच्यामार्फत आयसीजेएस, आयटीएसएसओ, क्रायमॅकसह इतर पोर्टलबाबत प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवल्या जातात आणि वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सपोनी शिवसांब घेवारे यांच्यासह सीसीटीएनएस शाखेतील कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी, देखरेख अधिकारी, अंमलदार यांनी केलेल्या वेळेत व अचूक कामकाजामुळे हिंगोली जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे. दिनांक 14 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथून जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती देण्यात आली.