Hingoli Petrol Sale Ban: हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी अत्यावश्यक सुविधा अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
हिंगोली (Hingoli Petrol Sale Ban) : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 19 मे 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी अत्यावश्यक सोयी-सुविधा तात्काळ आणि सुस्थितीत उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशात सार्वजनिक हित लक्षात घेऊन सहा प्रमुख सुविधा अनिवार्य केल्या आहेत. प्रत्येक पंपावर ग्राहकांसाठी स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करावी लागणार आहे. त्याचबरोबर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत, ज्यामध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अद्ययावत औषधांसह फर्स्ट एड किट प्रत्येक पंपावर ठेवणे आवश्यक केले आहे. वाहनांमध्ये मोफत हवा भरण्याची यंत्रणा कायम सुरू स्थितीत ठेवावी लागेल. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी पंपावर तक्रार पुस्तिका आणि महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावे लागतील. आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा आणि वाळूच्या बादल्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या व कार्यान्वित स्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सुरक्षिततेच्या कारणास्तव (Hingoli Petrol Sale Ban) इंधन विक्रीबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला कॅन, प्लास्टिक बाटली किंवा इतर कोणत्याही भांड्यात ठोक स्वरूपात पेट्रोल किंवा डिझेल देता येणार नाही. इंधन फक्त वाहनांच्या टाकीतच भरावे लागेल. इंधनाचा अनधिकृत साठा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या सूचनांचे उल्लंघन झाल्यास किंवा ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित पेट्रोल-डिझेल पंप धारकावर पेट्रोलियम अॅक्ट 1934 व नियम 2002 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. उन्हाळ्यात नागरिकांना पंपावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या (Hingoli Petrol Sale Ban) आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व पंपचालकांना देण्यात आल्या आहेत.