परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
२७ मेपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन
हिंगोली (Hingoli News) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्यामार्फत या मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी २१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार ही यादी तयार करण्यात आली असून नागरिकांच्या पाहणीसाठी ती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही प्रारूप मतदार यादी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत, कळमनुरी व हिंगोली, तसेच तहसिल कार्यालय हिंगोली, पालम, औंढा, सेनगाव येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. याशिवाय हिंगोली नगर परिषद व पालम, औंढा, सेनगाव नगर पंचायत कार्यालयातही नागरिकांना यादी तपासता येणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदीतील तपशील दुरुस्त करण्याबाबत कोणाची हरकत असल्यास विहित नमुना क्रमांक १७, ७ किंवा ८ मध्ये आवश्यक कागदपत्रांसह २७ मे २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावा लागेल. टपालाद्वारे अर्ज पाठविल्यास तो मुदतीपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींवर कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ३१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
या प्रक्रियेमुळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.