Hingoli Municipal Council: नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी आज सकाळी शहरातील मध्यवर्ती भाजी मंडईला अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी भाजी मंडईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे..
स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी, व्यापाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
हिंगोली (Hingoli Municipal Council) : नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी आज सकाळी शहरातील मध्यवर्ती भाजी मंडईला अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी भाजी मंडईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आणि अस्वच्छतेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर स्वच्छ करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.
सकाळच्या सुमारास उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी भाजी मंडईत फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी कचरा साचलेला पाहून त्यांनी पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व त्वरित स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले. तसेच अस्वच्छतेच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी भाजीपाला बसवून विक्री करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
वाहतुकीस अडथळा नको; व्यापाऱ्यांना सूचना
भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांना आणि ग्राहकांना फिरताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध न बसता रस्ता मोकळा ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येकाने आपल्या दुकानाभोवती स्वच्छता राखावी आणि कचरा योग्य ठिकाणीच टाकावा, असे त्यांनी व्यापाऱ्यांना बजावले.
या (Hingoli Municipal Council) पाहणी दरम्यान भाजी मंडईतील काही स्थानिक व्यापारी आणि नागरिक उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांच्यासोबत उपस्थित होते. उपनगराध्यक्षांनी स्वतः रस्त्यावर उतरून भाजी मंडईतील समस्यांची दखल घेतल्याने परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष जागेवर येऊन दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी सकारात्मक स्वागत केले.